रियो डि जनेरियो : फुटबॉल वर्ल्ड कपची मेगा फायनल रंगेल ती अर्जेन्टीना आणि जर्मनीमध्ये. या फायनलच्या निमित्तानं पुटबॉल प्रेमींनी सुपर संडेचा सुपर मुकाबला पाहायला मिळणार आहे. 24 वर्षांनी अर्जेन्टाईन टीमला वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरण्याची संधी आहे. तर विक्रमी आठवण्यांदा फायनल गाठणारी जर्मन टीम चौथ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावण्यास आतूर असेल.
फुटबॉल वर्ल्ड कपच्या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी अर्जेन्टीना आणि जर्मनीमध्ये घमासान होणार आहे. लिओनेल मेसीच्या अर्जेन्टाईन टीमनं पाचव्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश केलाय. तर जर्मनीची टीम आठव्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहचली आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात या दोन्ही टीम्स तिसऱ्यांदा फायनलमध्ये आमने-सामने येतायत.
1986च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये 3-2 नं अर्जेन्टीनाच्या टीमनं बाजी मारली होती. तर 1990मध्ये जर्मनीनं 1-0 नं विजय मिळवत 1986च्या फायनलमधील पराभवाची सव्याज परतफेड केली होती. त्याचप्रमाणे युरोपियन टीम आणि लॅटिन अमेरिकन टीम वर्ल्ड कपमध्ये 10व्यांदा एकमेकांसमोर येतायत. यामध्ये सातवेळा लॅटन अमेरिकन टीमनं विजयश्री मिळवली आहे. जर्मनीनं 2006 आणि 2010च्या वर्ल्ड कपमध्ये अर्जेन्टाईन टीमला क्वार्टर फायनलमध्येच पॅकअप करायला भाग पाडलं होतं. त्यामुळे या पराभवाची परतफेड करण्यासाठी मेसीची टीम सज्ज आहे.
जर्मनीच्या टीमला विजयासाठी हॉट फेव्हरिट मानलं जातंय. सेमी फायनलमध्ये ब्राझिलियन टीमचा जर्मनीनं 7-1 नं सुपडा साफ केला होता. त्यामुळंच जोकिम लो यांच्या टीमकडून अपेक्षा उंचावल्यात. थॉमस मुलर, मिरोस्लाव्ह क्लोसा, मेसूट ओझिल, टोनी क्रूस, बास्टिन श्वाईनस्टायगर, मॅट्स हमेल्स आणि सामी खेदीरासारख्या स्टार फुटबॉलपटूंची मांदियाळी या टीममध्ये आहे. प्रत्येक मॅचमध्ये त्यांच्या विजयात एक नवा हिरो समोर आलाय. त्यातच जर्मनीची अभेद्य भिंत अर्थातच मॅन्यूएल नेवरही अर्जेन्टीनाला रोखण्यास सज्ज आहे.
तर अर्जेन्टाईन टीमची भिस्त ही कॅप्टन लिओनेल मेसीवर असेल. तब्बल 24 वर्षांनी अर्जेन्टीनाचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची सारी जबाबदारी त्याच्यावर आहे. आता अर्जेन्टीनाचं हे स्वप्न मेसी सत्यात उतरवतो का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याला गोन्झालो हिग्वेनची साथ मिळणार आहे. या दोघांसमोर जर्मनीच्या बचावफळीला भेदून गोल करण्याचं आव्हान असेल. तर जर्मनीचा गोलकिपर नेवर आणि अर्जेन्टीनाचा गोली रोमेरो या दोघांमध्येही अनोखी लढाई फुटबॉलप्रेमींना पाहायला मिळेल. दोन्ही टीम या विजयासाठी प्रमुख दावेदार आहेत. मात्र, ज्या टीमच्या कोचची रणनिती सर्वोत्तम असेल ती टीमच या मॅचमध्ये बाजी मारेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.