भडकलेल्या धोनीची बीसीसीआयकडे तक्रार

अमेरिकेत वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 वेळी झालेल्या गोंधळामुळे भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी चांगलाच भडकला आहे.

Updated: Sep 5, 2016, 04:17 PM IST
भडकलेल्या धोनीची बीसीसीआयकडे तक्रार  title=

मुंबई : अमेरिकेत वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 वेळी झालेल्या गोंधळामुळे भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी चांगलाच भडकला आहे. याबाबत धोनीनं बीसीसीआयकडे तक्रार केली आहे. दुसऱ्या टी-20वेळी सॅटलाईट सिग्नलेवळी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मॅच 50 मिनीटं उशीरा सुरु झाली. 

सनसेट अॅण्ड व्हाईन ही प्रॉडक्शन कंपनी स्टार स्पोर्ट्सला सॅटलाईट सिग्नल अपलिंक करते, पण सनसेट अॅण्ड व्हाईनला हे सिग्नल अपलिंक करताना तांत्रिक अडचण येत होती. या कारणामुळे मॅच उशीरा सुरु झाली. 

मॅच सुरु करण्याची धोनीनं वारंवार मागणी केली, पण लवकरच तांत्रिक बिघाड दुरुस्त होईल असं धोनीला सनसेट अॅण्ड व्हाईनकडून सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आयसीसीच्या नियमांनुसार पाऊस, कमी प्रकाश आणि मैदान खराब असेल तरच मॅच उशीरा सुरु होऊ शकते. याच नियमाचा धागा पकडून धोनीनं बीसीसीआयकडे तक्रार केली आहे. 

वेस्ट इंडिजविरुद्धची ही दुसरी मॅच पावसामुळे रद्द करण्यात आली. 20 ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजला 143 रन बनवता आल्या. त्यानंतर बॅटिंगला आलेल्या भारतानं 2 ओव्हरमध्ये 15 रन केल्या. 2 ओव्हरनंतर आलेल्या पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला. 

टी20मध्ये दुसऱ्या इनिंगच्या 5 ओव्हर झाल्या तर डकवर्थ लुईस नियमानुसार मॅचचा निकाल लागतो. त्यामुळे ही मॅच वेळेवर सुरु झाली असती तर मॅचचा निकाल सहज लागला असता. वेस्ट इंडिजविरुद्धची ही 2 टी-20 ची सीरिज भारताला 1-0नं गमवावी लागली.