एक दिवस धोनीला भीक मागावी लागेल: योगराज सिंह

क्रिकेटपटू युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी पुन्हा एकदा टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीवर निशाणा साधलाय. त्यांनी धोनीबद्दल अनेक आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केले आहेत. टीम इंडियामध्ये मुलगा युवराजला जागा न मिळाल्यानं योगराज सिंह यांनी पुन्हा धोनीलाच दोषी ठरवलंय. 

Updated: Apr 7, 2015, 03:24 PM IST
एक दिवस धोनीला भीक मागावी लागेल: योगराज सिंह title=

नवी दिल्ली: क्रिकेटपटू युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी पुन्हा एकदा टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीवर निशाणा साधलाय. त्यांनी धोनीबद्दल अनेक आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केले आहेत. टीम इंडियामध्ये मुलगा युवराजला जागा न मिळाल्यानं योगराज सिंह यांनी पुन्हा धोनीलाच दोषी ठरवलंय. 

महेंद्रसिंग धोनी हा रावणासारखाच अहंकारी असून एक दिवस त्यांचा अहंकार मोडेल आणि त्याला कंगाल होऊन भीक मागावी लागेल असा तिखट शब्दात योगराज सिंग यांनी धोनीवर टीकेची झोड उठवली आहे. 

२०११ मधील वर्ल्डकपचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरलेल्या युवराज यंदाच्या वर्ल्डकपमध्ये स्थान न मिळाल्याने महेंद्रसिंग धोनीवर टीका होत आहे. युवराज सिंगचे वडिल आणि माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी तर धोनीविरोधात मोहीमच उघडली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये योगराज सिंग यांनी धोनीवर आक्षेपार्ह टीका केली. 

योगराज म्हणाले, धोनी हा अतिशय अहंकारी व्यक्ती असून याबाबतीत तो रावणापेक्षाही वरचढ आहे. ज्यापद्धतीनं रावणाचा अहंकार मोडला होता त्याचप्रमाणे धोनीचाही अहंकार मोडला जाईल. प्रसारमाध्यमांनी धोनीला हिरो बनवलं असून प्रत्यक्षात धोनीमध्ये तेवढी कुवतच नाही असं त्यांनी म्हटलं आहे. 

२०११ मधील वर्ल्डकपमधील फायनलमध्ये धोनी स्वतः चौथ्या क्रमांकावर उतरला आणि संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मग यंदाच्या वर्ल्डकपमधील सेमीफायनलमध्ये धोनी चौथ्या क्रमांकावर का आला नाही? असा सवालही योगराज सिंग यांनी उपस्थित केला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.