नवी दिल्ली: परीक्षेमध्ये कॉपी करणं, चीटिंग करणं हे काही आपल्याला नवं नाही. अशा अनेक घटना आपण ऐकत आणि पाहत असतो. पण चक्क बुद्धीबळ स्पर्धेत चीटिंग झालीय. ऐकून धक्का बसेल पण हे सत्य आहे.
दिल्लीतील डॉक्टर हेगडेवार बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँड मास्टर प्रवीण ठिपसे यांनी बाजी मारली. पण ठिपसे यानं ज्याचा पराभव केला तो ध्रुव कक्कर चक्क चीटिंग करतांना पकडला गेलाय.
१९ वर्षीय ध्रुवच्या अचूक खेळी पाहून प्रवीण ठिपसे थक्क झाले. त्यांनी सामना गमावला पण त्यांना ध्रुवचा संशय आला आणि त्यांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
ध्रुवची अधिकाऱ्यांनी झडती घेतली असता धक्कादायक प्रकार समोर आला. ध्रुवनं आपल्या कमरेला आणि पायाला मोबाईल फोन चिकटवले होते. कानात इअरफोन होता. हा इअरफोन काढण्यासाठी चक्क लोहचुंबकाचा वापर करावा लागला, कारण तो खूप लहान होता. ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांची प्रत्येक खेळी ध्रुव या फोनद्वारे एका मित्रापर्यंत पोहोचवत होता. मग तो मित्र कम्प्युटरच्या मदतीनं ध्रुवला पुढची खेळी सांगायचा. अशापद्धतीनं खेळून ध्रुवनं प्रवीण ठिपसे यांचा पराभव केला.
पण चीटिंग उघडकीस आल्यानंतर ध्रुवची भारतीय बुद्धिबळ संघटना अर्थात एआयसीएफकडे तक्रार करण्यात आली असून ठिपसे यांना विजेता घोषित करण्यात आलं. तसंच ध्रुववर बंदी घालण्याची मागणी अधिकाऱ्यांनी एआयसीएफकडे केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.