डंकन फ्लेचर यांच्याकडून अपेक्षाभंग... पदरी निराशा!

गॅरी कस्टर्न यांच्यानंतर डंकन फ्लेचर यांनी टीम इंडियाच्या कोचपदाची सूत्र हाती घेतली. फ्लेचर हे टीम इंडियाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवतील अशी अपेक्षा होती. मात्र, फ्लेचर यांना त्यात काही यश आलं नाही. डंकन फ्लेचर यांना कोच म्हणून आपली छाप सोडता आली नाही. 

Updated: May 3, 2015, 10:37 PM IST
डंकन फ्लेचर यांच्याकडून अपेक्षाभंग... पदरी निराशा!  title=

मुंबई : टीम इंडियाच्या नव्या कोचचा शोध सुरु झाला आहे... आता नवा कोच कोण असेल याचीच उत्सुकता क्रिकेट जगताला लागून राहिलीय.याच अनुषंगाने काही महत्त्वाच्या कोचेसचा आढावा घेणारी विशेष लेखमालिका 'कुणी घडवलं, कुणी बिघडवलं?'... 

गॅरी कस्टर्न यांच्यानंतर डंकन फ्लेचर यांनी टीम इंडियाच्या कोचपदाची सूत्र हाती घेतली. फ्लेचर हे टीम इंडियाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवतील अशी अपेक्षा होती. मात्र, फ्लेचर यांना त्यात काही यश आलं नाही. डंकन फ्लेचर यांना कोच म्हणून आपली छाप सोडता आली नाही. 

गॅरी कर्स्टन यांनी टीम इंडियाच्या कोचचं पद सोडलं आणि त्यांच्याच शिफारसीमुळे झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटर डंकन फ्लेचर यांची टीम इंडियाच्या कोचिंगपदी नियुक्ती करण्यात आली. डंकन फ्लेचर यांनी 1999 ते 2007 पर्यंत इंग्लंड टीमच्या कोचिंग पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडने तब्बल 18 वर्षांनी प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ऍशेज सीरिजमध्ये विजय मिळवला होता. यामुळेच टीम इंडियाच्या कोचिंगपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर ते नक्कीच टीम इंडियालाही एका नव्या उंचीवर घेऊन जातील, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात फ्लेचर यांना आपली छाप सोडण्यात फारस यश आलं नाही. किंबहुना त्यांची कामगिरी पाहता आता परदेशी कोच नकोच असा सूरच क्रिकेट वर्तुळात उमटू लागला.

परदेशी भूमीवर तर टीम इंडिया सातत्याने पराभूत ठरली. यामुळेच डंकन फ्लेचर हटाव मोहिमेने भारतीय क्रिकेटवर्तुळात जोर पकडला. अनेक पातळ्यांवर डंकन फ्लेचर हे कमी पडल्याचं जाणवलं. नवीन स्ट्रेटेजी आखणं, टीम इंडियांमधील कॉम्बिनेशन आणि टीम केमिस्ट्रीमध्ये ते अपयशी ठरले. याचबरोबर नवे पर्याय निर्माण करण्यातही त्यांना अपयश आलं. त्यांच्याकडून त्याच त्याच चुका घडत गेल्या. त्यांच्या डिफेन्सिव्ह माईंडसेटमुळे तर टीम इंडियाचं चांगलचं नुकसान झालं. 

2011-12 मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये सलग आठ टेस्टमध्ये धोनी अँड कंपनीचा पराभव झाला. 2013-14 मध्येही दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडच्या धर्तीवर भारतीय टीमच्या पदरी निराशाच पडली. 2014-15 मध्ये पुन्हा ऑस्ट्रेलियात टीम इंडियानं सपाटून मार खाल्ला. परदेशी भूमीवर फ्लेचरना टीम इंडियाला विजय साकारुन देताच आला नाही. त्यांचं कोच म्हणून अनेकदा अस्तित्वच जाणवलं नाही. यामुळेच अखेर बीसीसीआयने रवी शास्त्री यांची टीम डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली. रवी शास्त्री यांनीही आक्रमकपणे टीम इंडियाची सूत्रं हाती घेतली. यानंतर तर डंकन फ्लेचर कोच आहे की शास्त्री? अशी परिस्थिती निर्माण झाली.

डंकन फ्लेचर हे स्वत: एकही टेस्ट मॅच खेळलेले नाहीत आणि केवळ सहाच वन-डे इंटरनॅशनल मॅच खेळलेले आहेत. कदाचित त्यामुळेच टीम इंडियाला गाईड करण्यात ते कुठेतही कमी पडले असावेत. याचबरोबर भारतीय डोमेस्टिक मॅचेसला त्यांनी कमीच हजेरी लावली. यामुळे इथल्या वातावरणातील आणि इथंल्या क्रिकेटचा त्यांना नीट अभ्यासही करता आला नसावा. कारण काहीही असो मात्र डंकन फ्लेचर यांना टीम इंडियाचे कोच म्हणून काही आपली छाप सोडला आली नाही एवढ मात्र नक्की...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.