नवी दिल्ली : आयपीएलच्या नवव्या हंगामासाठीच्या लिलावात स्थानिक खेळाडूंमध्ये सर्वाधिक लाभ झाला तो मुरुगन अश्विन. लेग स्पिनर असलेला अश्विन तामिळनाडू संघाकडून खेळतो. अश्विनची बेस प्राईज १० लाख इतकी होती. मात्र लिलावात त्याच्यावर तब्बल साडेचार कोटींची बोली लावण्यात आली. २५ वर्षीय या क्रिकेटपटूला रायजिंग पुणे सुपरजायंट टीमने त्याला विकत घेतलेय.
कोण आहे एम. अश्विन
अश्विन आतापर्यंत तीन प्रथम श्रेणी सामने खेळलाय. यात त्याने २४६ धावा देताना केवळ एक विकेट घेतलीये. तर लिस्ट एच्या दोन सामन्यांत अश्विनने ६९ धावा देऊन तीन विकेट घेतल्यात. इतक्या साधारण प्रदर्शनानंतरही लिलावात अश्विनला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी फ्रंचायझींमध्ये स्पर्धा लागली होती.
याचे कारण अश्विन २०१५-१६मध्ये सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत त्याने जबरदस्त कामगिरी केली. या संपूर्ण स्पर्धेत अश्विन एकूण सहा सामने खेळला. यात त्याने २३ षटकांत १० विकेट घेतल्या. तर ५.५२च्या सरासरीने धावा दिल्या. एम. अश्विन तामिळ लेखर एरा मुरुगन यांचा मुलगा आहे.