धोनीला कप्तानपदावरून हटवण्याची गरज नाही - बीसीसीआय

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)नं आयसीसी वर्ल्डकपसाठी उरलेला केवळ सहा महिन्यांचा कालावधी लक्षात घेऊन महेंद्र सिंग धोनीच कप्तानपदी कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलंय.

Updated: Aug 20, 2014, 12:31 PM IST
धोनीला कप्तानपदावरून हटवण्याची गरज नाही - बीसीसीआय title=
फाईल फोटो

मुंबई : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)नं आयसीसी वर्ल्डकपसाठी उरलेला केवळ सहा महिन्यांचा कालावधी लक्षात घेऊन महेंद्र सिंग धोनीच कप्तानपदी कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलंय.

इंग्लंडमध्ये टीम इंडियाला पत्कराव्या लागलेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनी चहुबाजुंनी टीकेचा धनी होतोय. यानंतर, धोनीला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी होतेय. यावर, स्पष्टीकरण देताना बीसीसीआयनं धोनीला कर्णधारपदावरून हटवण्यात येणार नाही, असं स्पष्ट केलंय.  

रविवारी संपुष्टात आलेल्या टेस्ट सीरिजमध्ये भारतीय टीमला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागलाय. त्यानंतर टीम संबंधित अनेक कडक निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आलेत. पण, यावेळी बीसीसीआयनं धोनीचं समर्थनच केलंय. ‘धोनीला कप्तानपदावरून हटविण्याची कोणतीही गरज नाही’ असं बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी म्हटलंय.

बीसीसीआयनं मंगळवारी, कडक पावलं उचलत भारतीय टीमचे मुख्य कोच डंकन फ्लेचर यांचे पंख छाटलेत. फ्लेचर यांनी निवड केलेल्या क्षेत्ररक्षण कोच ट्रेवर पेनी आणि बॉलर कोच जोए डावेस यांना सुट्टीवर पाठवण्यात आलंय. यावेळी, बीसीसीआयनं कडक भूमिका घेत, 25 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या एक दिवसीय श्रृंखलेसाठी इंडियाचा माजी कॅप्टन रवी शास्त्रीची टीमच्या संचालकपदी नियुक्ती केलीय.

याशिवाय, माजी भारतीय खेळाडू संजय बांगर आणि भरत अरुण यांना सहायक कोच बनवण्यात आलंय. हैदराबादचे माजी स्पीन बॉलर रामकृष्णन श्रीधर यांना एक दिवसीय श्रृंखलेसाठी क्षेत्ररक्षण कोचची जबाबदारी देण्यात आलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.