नवी दिल्ली : आपण पुरुषप्रधान वातावरणात वावरतोय, असं भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिला प्रकर्षानं जाणवतंय... तिनं ते उघडपणे बोलूनही दाखवलंय. शिवाय, आपण केवळ 'पब्लिक फिगर' आहोत म्हणून कुणीही येऊन काहीही विचारण्याचा किंवा म्हणण्याचा हक्क मी कुणालाही दिलेला नाही, असंही तिनं ठणकावून सांगितलंय.
याबद्दल दाखला देताना सानियानं एक अनुभवही सगळ्यांशी शेअर केला. विम्बल्डनचा खिताब आपल्या नावावर नोंदवल्यानंतर दोन दिवसांनी आपल्याला एका पत्रकार परिषदेत 'तू आई कधी बनणार?' असा प्रश्न विचारण्यात आल्याचंही तिनं म्हटलंय. मीडियाच्या अशाच प्रश्नांवर ताशेरे ओढत 'तुम्ही मूल कधी जन्माला घालणार असं एखाद्याला विचारणं हे अपमानकारकच आहे. मी केवळ पब्लिक फिगर आहे म्हणून माझ्या बेडरुममध्ये काय चाललंय हे विचारण्याचा अधिकार कुणालाही नाही' असं तिनं म्हटलंय.
'बीबीसी'च्या '१०० वुमन सीरिज'च्या मुलाखतीत बोलताना सानियानं हे वक्तव्य केलंय. आपण पुरुषप्रधान जगात वावरतो... लोकांनी हे कितीही नाकारलं तरीही हे सत्य आहे. एखाद्या महिलेला एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप झगडावं लागतं... आणि हे केवळ भारताबद्दल नाही तर हे आपण जगाबद्दल बोलतोय, असंही तिनं यावेळी स्पष्ट केलं.
एखाद्या महिलेनं आपली एखादी इच्छा व्यक्त केली की तिला लगेचच बंडखोर किंवा उनाड किंवा करिअर माईंडेड असे अनेक 'लेबल' चिटकवले जातात, पण अशा पुरुषांना मात्र 'महत्त्वकांक्षी' म्हटलं जातं, असंही सानियानं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.