मुंबई : क्रिकेट वर्ल्डकपमध्ये टीम इंडियानं सलग सहा वेळा विजय प्राप्त करून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवलाय. पण, या १५ सदस्यांच्या टीममध्ये तीन चेहरे असेही आहेत ज्यांना खेळण्याची संधीच मिळालेली नाहीय... त्यामुळे, ते बेंचवर बसूनच विजयरथाचे साक्षीदार बनलेत.
हे तीन खेळाडू म्हणजे, अक्षर पटेल, स्टुअर्ट बिन्नी आणि अंबाती रायडू...
कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं क्वार्टर फायनलमध्ये जागा पक्की केल्यानंतर इतर लीगप्रमाणेच या लीगमॅचमध्येही आपल्या पहिल्या दहा खेळाडूंमध्ये बदल केला नाही, ते पाहता या त्रिमूर्तीला या वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता कमीच दिसतेय.
भुवनेश्वर कुमारनंही बराच काळ बेंचवरच काढलाय. पण, त्याला एका मॅचमध्ये मैदानात उतरण्याची संधी तरी मिळाली होती. अंबाती रायडू, अक्षर पटेल आणि स्टुअर्ट बिन्नी यांना वर्ल्डकपच्या १५ सदस्यीय टीममध्ये सहभागी करून घेण्यात आलं होतं. पण, धोनीनं मात्र विजयी घोडदौडीत पहिल्या दहा महारथींवरच विश्वास दाखवलाय. मोहम्मद शमी जखमी झाल्यानंतर धोनीनं केवळ एकदाच यामध्ये बदल केला होता. संयुक्त अरब आमिरात विरुद्धच्या मॅच दरम्यान शमीला आराम दिला गेला होता आणि त्याची जागा भुवनेश्वर कुमारला सहभागी करून घेण्यात आलं होतं.
भारतानं यजमानपदी असताना २०११ चा वर्ल्डकप जिंकला होता. तेव्हाही प्रवीण कुमार आणि आर. अश्विन यांना संपूर्ण वेळ बेंचवर बसूनच काढावा लागला होता. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या मैदानात खेळल्या जाणाऱ्या वर्ल्डकपमध्ये आत्तापर्यंत भारतीय टीम अजिंक्य राहिलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.