रोहतक : रिओ ऑलिंपिकमध्ये महिला कुस्ती स्पर्धेत कास्य पदक जिंकणारी भारतीय खेळाडू साक्षी मलिकचा साखरपुडा झाला आहे. साक्षीचा रोहतकमधील तिच्या घरी आज सत्यव्रत सांगवानसोबत साखरपुडा झाला. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.
२४ वर्षाच्या साक्षी मलिकने २३ वर्षीय सत्यव्रतसोबत विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. सत्यव्रत कादियान हा रोहतकमध्ये कुस्तीचा आखाडा चालवणारे पहेलवान सत्यवान यांचा मुलगा आहे. तो 97 किलो वजनी गटात खेळतो.
पहेलवान सत्यवान हे सत्यव्रत आणि साक्षी या दोघांचे गुरु आहेत. सत्यवान यांना अर्जुन अॅवॉर्ड सुद्धा मिळाला आहे. गुडगावमध्ये झालेल्या भारत केसरी स्पर्धेत सत्यव्रत तीसऱ्या स्थानावर होता. कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याने भारताकडून सिल्वर मेडल मिळवलं आहे.
सत्यव्रतने भारत केसरी आणि चंबल केसरी यासारखे खिताब देखील त्याच्या नावे केले आहेत. साक्षीने रिओ ऑलिंपिकमध्ये 12 व्या दिवशी भारताला मेडल मिळवून दिलं होतं. महिला कुस्तीमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून देणारी ती पहिला महिला खेळाडू ठरली होती.