रवी शास्त्री टीम इंडियाचे नवे कोच, मिळणार सर्वांत जास्त मानधन?

टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू रवि शास्त्री भारतीय संघाचे नवे कोच म्हणून सूत्र हाती घेण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून हा दावा केलाय. रवी शास्त्रींकडे टीम इंडियाच्या कोच पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. टीम इंडियाचे सध्याचे कोच डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ संपला आहे.

Updated: Jun 11, 2015, 02:14 PM IST
रवी शास्त्री टीम इंडियाचे नवे कोच, मिळणार सर्वांत जास्त मानधन? title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू रवि शास्त्री भारतीय संघाचे नवे कोच म्हणून सूत्र हाती घेण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून हा दावा केलाय. रवी शास्त्रींकडे टीम इंडियाच्या कोच पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. टीम इंडियाचे सध्याचे कोच डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ संपला आहे.

वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, भावी कोच रवी शास्त्रींना ७ कोटी रूपये मानधन मिळण्याची शक्यता आहे. असं जर घडलं तर शास्त्री भारतीय क्रिकेट संघाचे सर्वात महागडे कोच ठरतील. कोणत्याही भारतीय क्रिकेट कोचला आजपर्यंत एव्हढं मानधन मिळालेलं नाही. भारतीय संघाच्या बांग्लादेश दौऱ्यानंतर याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

शास्त्री यांना आपण टीम ड्रेसिंगमध्ये पाहू इच्छितो, अशी इच्छा टेस्ट टीम कॅप्टन विराट कोहलीनं बीसीसीआयकडे व्यक्त केल्यानंतर नव्या कोचचा शोध संपुष्टात आला होता, असंही या वर्तमानपत्रानं म्हटलंय.

विराटसोबत शिखर धवन आणि सुरेश रैना यांनीही शास्त्रींची स्तुती केल्याचं समजतयं. मागच्या वर्षी इंग्लंड कसोटी दौऱ्यानंतर शास्त्री भारतीय संघाचे संचालक झाले होते. यानंतर संघाच्या कामगिरीत सुधारणा पाहायला मिळालीय.

सध्या रवी शास्त्री टीव्ही कॉमेंटेटर म्हणून चार कोटींचं वार्षिक मानधन घेत आहेत. संघाचे संचालक झाल्यापासून बीसीसीआयने त्यांचे मानधन सहा कोटी केलंय. कोच झाल्यावर त्यांना ६.४ कोटींचं मानधन दिलं जाईल. एव्हढं मानधन घेणारे ते पहिलेच कोच असतील. सध्याचे कोच डंकन फ्लेचर यांना ४.२ कोटी मानधन दिलं जायचं. त्यांच्यासोबतचा करार वर्ल्डकप २०१५ पर्यंत होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.