मुंबई : जगभरातील सर्वांत श्रीमंत शंभर खेळाडूंच्या यादीत भारताच्या फक्त महेंद्रसिंह धोनीचे नाव आहे. फोर्ब्स मासिकाने जगातील सर्वांत श्रीमंत शंभर खेळाडूंची नावे जाहीर केली, या यादीत महेंद्र सिंह धोनीच्या नावाचा समावेश आहे.
या यादीत अमेरिकेचा मुष्टियोद्धा फ्लॉइड मेवेदर हा अव्वल स्थानावर आहे. याबरोबरच गोल्फपटू टायगर वुड्स, स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडरर, पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या दहा खेळाडूंमध्ये आहेत.
मेवेदर याची यंदाची कमाई ३०० मिलियन डॉलर इतकी आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत त्याच्या कमाईत दुपट्टीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षांत तिसऱ्यांदा मेवेदरला सर्वांत श्रीमंत खेळाडू घोषित करण्यात आले आहे.
भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी २३ व्या स्थानावर आहे. गेल्यावर्षी तो २२ व्या स्थानावर होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाने अंतिम फेरी गाठली होती. धोनीच्या या सर्व कमाईचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.
तर सर्बियाचा नोव्हाक जोकोविच (१३), सेबॅस्टियन व्हेटेल (२१), रॅफेल नदाल (२२) आणि वॅन रुनी (३४) आणि उसेन बोल्ट (७३) या प्रमुख खेळाडूंना यादीत स्थान देण्यात आले आहे.
धोनीची एकूण संपत्ती ३१ मिलियन डॉलर एवढी आहे, रूपयांत १९८ कोटी रुपये एवढी ही संपत्ती आहे. धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, सध्या त्याच्याकडे एकदिवसीय संघाचे कर्णधारपद आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.