लंडन : सर्बियन ब्युटी अॅना इव्हानोविकनं टेनिस कोर्टला अलविदा केला. तिच्या अचानक निवृत्तीनं टेनिसप्रेमींना धक्का बसला. टेनिस करिअरमध्ये एक ग्रँडस्लॅम जिंकणारी इव्होनोविक आपल्या ग्लॅमरस अंदाजासाठीच ओळखली जायची.
अॅना इव्हानोविक . टेनिसच्या दुनियेतील ग्लॅमरस चेहरा. टेनिसकोर्टपेक्षा टेनिसकोर्ट बाहेरचा तिचा अंदाजच टेनिसप्रेमींना अधिक भावला. मात्र, या सर्बियन ब्युटीनं घेतलेली तडकाफडकी निवृत्ती सा-यांनाचा आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. वयाच्या २९ व्या वर्षी तिनं टेनिसला अलविदा केला.
दुखापतींमुळे बेजार झाल्यानं तिनं टेनिसमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. इव्हानोविकनं आपल्या सौंदर्यानं टेनिसप्रेमींवर आपली भुरळ तर घातलीच. शिवाय ती काहीकाळ नंबर वन टेनिसपटूही होती.
२००८ इव्होनोविक आपल्या करिअरमध्ये टेनिसच्या शिखरावर होती. याच सीझनमध्ये तिनं फ्रेंच ओपन जिंकत इतिहास रचला. फ्रेंच ओपन जिंकणारी ती पहिली महिला सर्बियन टेनिसपटू ठरली. त्याचप्रमाणे २००७ मध्ये फ्रेंच ओपन आणि २००८ मध्ये तिला ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल गाठण्यात यश आलं होतं. फ्रेंच ओपनसह तिनं आपल्या टेनिसकरिअरमध्ये १५ डब्ल्यूटीए टायटल जिंकली होती.
१३ वर्षांच्या टेनिस करिअरमध्ये इव्हानोविकला फारसं यश मिळालं नाही. मात्र, आपल्या ग्लॅमरस अंदाजानं तिनं टेनिसप्रेमींवर मोहिनी घातली होती. त्यामुळे या सर्बियन ग्लॅमडॉला टेनिसप्रेमी कायमच मिस करतील.