सिडनी : ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्ननं आपल्याच एका जुन्या साथीदावर निशाणा साधलाय. शेन वॉर्नच्या म्हणण्यानुसार, स्टीव वॉ सर्वात 'स्वार्थी' क्रिकेटर आहे.
एका ऑस्ट्रेलियन टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत वॉर्ननं स्टीववर टीका केलीय. १९९९ साली मला खूपच वाईट वाटलं होतं जेव्हा वेस्ट इंडिज विरुद्ध सीरिजमध्ये त्यानं मला सहभागी करून घेतलं नव्हतं, असंही यावेळी वॉर्ननं म्हटलंय.
१७ वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवून आजही वॉर्न भावूक होताना दिसला. वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना स्टीव्ह (कॅप्टन), वॉर्न (उपकॅप्टन) आणि कोच ज्यॉफ मार्श यांना टीमची निवड करायची होती. यावेळी, वॉर्न फारसा फॉर्ममध्ये नव्हता परंतु, तरीही आपल्याला त्यावेळी बळीचा बकरा बनवण्यात आल्याचं त्यानं म्हटलंय.
वॉर्न सांगतो, मॅचसाठी जेव्हा टीम सिलेक्शनसाठी बसले तेव्हा स्टीवनं वॉर्नला म्हटलं, तू खेळत नाहीस... तेव्हा मी त्याला म्हटलं की तुला काय वाटतं, टीम कशी असायला हवी? तेव्हा उत्तरादाखल त्यानं मला म्हटलं 'टीमचा कॅप्टन मी आहे आणि तू पुढची मॅच खेळणार नाहीस'... त्याचे हे शब्द मला खूप लागले.