www.24taas.com, वृत्तसंस्था, सोची, रशिया
रशियात सुरु असलेल्या सोची ऑलिम्पिकमध्ये एक गंमतीदार गोष्ट घडली. आंघोळीसाठी गेला असताना अमेरिकेचा एक अॅथलिट चक्क बाथरूममध्येच अडकला... बाहेर पडण्यासाठी त्यानं बरेच प्रयत्नही केले... पण, शेवटी दरवाजा फोडूनच त्याला बाहेर पडावं लागलं.
झालं असं की, एनएफएल प्लेयर जॉनी क्विन आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला होता. आता, बाथरूमला जाताना कोण कशाला मोबाइल वैगेरे घेऊन जाईल? जॉनीनेही आपला मोबाईल बाहेरच ठेवला आणि आंघोळीसाठी बाथरुममध्ये शिरला. आंघोळ झाल्यानंतर बाहेर पडण्यासाठी जॉनीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण, काही केल्या दरवाजा उघडेना.
जॉनीनं मदत मिळविण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी बराच प्रयत्न केला... पण व्यर्थ... मग जॉनीनं बाथरूमच्या दरवाजावर धडका देऊन दारच तोडलं... या सगळ्या प्रकारात जॉनीला थोडीफार दुखापतही झाली. काही ठिकाणी खरचटलं... त्याला बाहेर पडण्याचा जास्त आनंद झाला.
`एथलिटिक्सच्या ट्रेनिंगमुळे मला दरवाजा तोडता आला. बाथरूमचा दरवाजा तोडता येईल असा होता त्यामुळेच मला बाहेर पडता आलं,` असं जॉनीनं बाहेर पडल्यानंतर हुश्श करत म्हटलंय.
हा किस्सा जॉनीने ट्विट करून आपल्या चाहत्यांशी शेअर केलाय. यात त्यानं रशियात सुरु असलेल्या ऑलिम्पिकचं उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल आयोजकांचं कौतुकही केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.