लाहोर : पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघातील लैंगिक छळामुळे एका तरूण क्रिकेटपटूने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हलिमा रफिक असे 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूचे नाव आहे. तिने प्रचंड डिप्रेशनमुळे अॅसिड पिऊन आत्महत्या केली. पाक क्रिकेट प्रशासनातील एका व्यक्तीवर लैंगिक छळ केल्याचा आरोप तिने केला होता. त्या व्यक्तीने हे प्रकरण कोर्टात नेल्यानंतर हलिमा डिप्रेशनमध्ये गेली.
मुलतान येथे तिने रविवारी आत्महत्या केल्याने पाकिस्तान महिला क्रिकेटमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. जून महिन्यात झालेल्या एका दूरचित्रवाणी कार्यक्रमात हलिमा हिच्यासह सीमा जावेद, हिना गफूर, किरण इर्शाद आणि सबा गफूर या चौघींनी मुलतान क्रिकेट क्लबचे अध्यक्ष मौलवी सुलतान आलम, तसेच निवड समितीचे सदस्य मोहम्मद जावेद यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने दोन सदस्यांची चौकशी समिती नेमली होती. या समितीने या दोघांना दोषमुक्त ठरवले होते, तर आरोप करणाऱया महिला खेळाडूंवर सहा महिन्यांची बंदी घातली होती. आरोप करणाया तिघींनी आपला जवाब बदलला होता. मात्र गफूर आणि रफिक यांनी चौकशी समितीसमोर उपस्थित राहण्यास नकार दिला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.