मुंबई: 251 रुपयांमध्ये मिळणारा 'फ्रीडम 251' हा स्मार्टफोन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. एवढ्या कमी किमतीला हा फोन मिळत असल्यानं त्याची मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
दोनच दिवसांमध्ये 5 कोटी ग्राहकांनी हा फोन बूक केला आहे. पण आत्ता आमची क्षमता 25 लाख फोन देण्याचीच आहे, असं या मोबाईलची विक्री करणारी कंपनी रिंगिंग बेलनं स्पष्ट केलं आहे. या फोनसाठीचं बूकिंग संपायला आणखी दोन दिवस बाकी आहेत, पण एवढा मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे कंपनी ऑनलाईन बूकिंग बंद करायच्या विचारात आहे.
फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह तत्त्वावर हा फोन ग्राहकांना दिला जाणार आहे. 10 एप्रिलपासून या स्मार्टफोनच्या डिलिव्हरीला सुरुवात होणार आहे. 30 जूनपर्यंत बूकिंग केलेल्या ग्राहकांना त्यांचे स्मार्ट फोन मिळतील असा दावा कंपनीनं केला आहे.