गुगल X ट्विटर : भारतीयाला मिळाला ५४४ कोटींचा बोनस

गुगल आणि ट्विटरमध्ये सुरू असलेली चढाओढ सगळ्यांनाच परिचित आहे. पण, या चढाओढीचा फायदा एका मूळ भारतीय असलेल्या नागरिकाला झालाय. मूळ भारतीय पण अमेरिकेचे नागरिक असलेल्या नील मोहन यांनी ‘ट्विटर’मध्ये जाऊ नये यासाठी गुगलनं त्यांना तब्बल ५४४ कोटींचा बोनस बहाल केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 11, 2013, 09:59 AM IST

www.24taas.com, न्यूयॉर्क
गुगल आणि ट्विटरमध्ये सुरू असलेली चढाओढ सगळ्यांनाच परिचित आहे. पण, या चढाओढीचा फायदा एका मूळ भारतीय असलेल्या नागरिकाला झालाय. मूळ भारतीय पण अमेरिकेचे नागरिक असलेल्या नील मोहन यांनी ‘ट्विटर’मध्ये जाऊ नये यासाठी गुगलनं त्यांना तब्बल ५४४ कोटींचा बोनस बहाल केलाय.
आपल्याकडची कौशल्यं आणि ती कौशल्य मोठ्या खुबीनं जाणणारी माणसं कंपनीतून बाहेर पडणं हा आयटी कंपन्यांसाठी एक प्रकारचा ‘लॉस’ ठरतो. त्यामुळे अशा आयटी कंपन्या आपल्या माणसांची आणि तंत्रज्ञानाची काळजी मोठ्या खुबीनं घेतात. नील मोहन हे गुगलमध्ये जाहिरात उत्पादनाचे व्हाईसस प्रेसिडेंट म्हणून काम पाहतात.
काही दिवसांपूर्वी मोहन यांना ‘ट्विटर’कडून प्रॉडक्ट चीफच्या पदाची ऑफर मिळाली होती. गुगल या टॅलेंटेड इंटरनेट जाहिरातीमधल्या एक्सपर्ट हिऱ्याला कोणत्याही स्थितीत सोडू इच्छित नव्हती. त्यामुळेच नील यांनी प्रतिस्पर्धी कंपनीत जाऊ नये यासाठी गुगलनं त्यांना चक्क १०० मिलियन डॉलरचा बोनस बहाल केलाय. भारतीय चलन रुपयात याची किंमत ५४४ कोटी रुपये होते.
नील मोहनला गुगलनं दिलेला बोनस कंपनीच्या शेअर्सच्या स्वरुपात दिलाय. गुगलच्या शेयर्सच्या सद्य मार्केट किंमतीवरून या शेअर्सची किंमत ती आता १०० वरून १५० मिलियन डॉलर झालीय.

नील मोहन यांची तंत्रज्ञानाची समज, नव्या तंत्रज्ञानातील रेवेन्यू मॉडेल आणि त्याच्याशी संबंधित बिझनेस स्ट्रॅटेजीवर जबरदस्त पकड आहे. मोहन यांनीच आखलेल्या स्ट्रॅटजी आणि प्लानिंगमुळे गुगलला यंदा सात बिलियन डॉलर फायदा होण्याची शक्यता वर्तवली जातेय.