www.24taas.com, मुंबई
भारतीय रेल्वेला १६० वर्ष पूर्ण झाल्याची दखल जागतिक पटलावरही घेण्यात आली आहे. गुगल डुडलवरही भारतीय रेल्वेला स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गुगल या जगप्रसिद्ध वेबसाईटवर गुगल डुगल ह्या संकल्पने अंतर्गत त्यांच्या मेन पेजवर विशेष म्हणून त्यावर स्थान देण्यात येते. जगभरातील अनेक विविध गोष्टींसाठी गुगल डुगल समावेश करतं.
१६० वर्षांपूवी म्हणजेच १६ एप्रिल १८५३ या दिवशी मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे धावली. ब्रिटीशांनी आपल्या प्रशासकीय आणि व्यापारी सोयीसाठी रेल्वेचं जाळं देशात विणलं. मात्र, याच रेल्वेनं संपूर्ण देशाला एकत्र करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. महात्मा गांधींना रेल्वेतूनच प्रवास करताना `खरा भारत` दिसला. आजही आम ते खास अशा सर्वच प्रकारतल्या नागरिकांचे आवडते प्रवासाचे माध्यम रेल्वे हेच आहे.
भारतीय रेल्वे हे आशिया खंडातले सर्वात मोठे आणि जगात दुसऱ्या क्रमांकाचे नेटवर्क आहे. देशात दररोज ११,००० रेल्वे धावतात. यामध्ये ७,००० प्रवासी रेल्वे असून ४,००० मालगाड्यांचा समावेश यात आहे.