www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आकाश (टॅब्लेट) -४ या महत्त्वाकांक्षी योजनेला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं प्रदीर्घ विचारविनिमयानंतर हिरवा कंदिल दाखविला असून या टॅब्लेटच्या उत्पादनाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर लवकरच मांडला जाणार असल्याचं वृत्त आज सूत्रांनी दिलंय.
या प्रस्तावांतर्गत २२ लाख आकाश टॅब्लेट्सचे उत्पादन करण्याचा मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा विचार असून यासाठी पुरवठा संचलनालयाच्या माध्यमामधून ३३० कोटी रुपयांचा अर्थपुरवठा करण्याची योजना आखण्यात आली आहे. आकाश विद्यार्थ्यांना अनुदानित स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार असून पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत आकाश बाजारपेठेत दाखल होण्याची शक्य ता सूत्रांनी वर्तविली आहे.
कॅगनं आकाश टॅब्लेट योजनेमधील त्रुटींवर टीका करत या योजनेच्या सुरुवातीसाठी राजस्थानमधील जोधपूर आयआयटीची निवड केल्याबद्दल प्रश्न्चिन्ह उपस्थित केलं होतं. जोधपूर आयआयटीची आकाशच्या उत्पादनाची क्षमता लक्षात न घेता मंत्रालयानं या आयआयटीची निवड केल्याचा ठपका कॅगनं ठेवला होता. यानंतर आकाश प्रकल्पाच्या विकासाची जबाबदारी मुंबई आयआयटीवर सोपविण्यात आली होती.
आकाश-४ या नव्या टॅब्लेटमध्ये विद्यार्थ्यांना हिंदी, कन्नड, पंजाबी, गुजराती, तमिळ, मल्याळी, मणिपूरी अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये वाचन, लिहिणे आणि दृकश्राव्य माध्यमामधून संवाद साधण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.