www.24taas.com,
शुभांगी पालवे, झी मीडिया
मदर्स डे... भारतात मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आपल्या आईप्रती आपलं प्रेम आणि भावना व्यक्त करण्याचा हा दिवस...
अगदी मान्य की आईच्या प्रेमाचं ऋण तुम्ही आयुष्यभर फेडू शकणार नाहीत... पण, तुमचं तुमच्या आईवर किती प्रेम आहे हे या निमित्तानं का होईना, व्यक्त करायला काय हरकत आहे...
काही संस्कृती रक्षकांना ही पश्चिमी पद्धत भारतीयांनी आत्मसात करू नये, असं वाटतं. `मदर्स डे` म्हणजे `आईचा दिवस` असा सरळसोट अर्थ... पण, अगदी सिनेमांमध्येही, 'आपल्याकडे आई-बाप मेल्यानंतर त्यांचे दिवस घालतात... आणि आपण ती मरण्याच्या आधीच त्यांचे दिवस घालायला निघालोत', अशा आशयाचे डायलॉग भाव खाऊन जातात. अशा वाक्यांंना तितक्याच टाळ्याही मिळतात.
पण, आपली आई आपल्यासोबत असतानाच आपण तिच्यावर किती प्रेम करतो, हे तिला सांगायला... तिलाही तो आनंद द्यायला काय हरकत आहे? आपण आपल्या कामात कितीही व्यग्र असलो तरी थोडा वेळ का होईना, तो मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी राखून ठेवलाय हे म्हणायला आपली जीभ जड का होते?
हेही मान्य की तुमचं हेच प्रेम व्यक्त करण्यासाठी एकच दिवस नसावा किंबहुना नसतोच... पण, कुठेतरी तुटलेल्या कड्या पुन्हा जोडण्यासाठी, आपल्यापासून दूरवर राहणाऱ्या आईला `आपण दूर राहूनही तुझ्याचजवळ आहोत` हे या निमित्तानं का होईना... पण, जाणवून द्यायला काय हरकत आहे...
प्रत्येकाचे विचार वेगळे असतील पण (काही अपवाद वगळता) आपल्या आईबद्दलच्या भावना मात्र सारख्याच असतील. नाही का? याचबद्दल आम्हाला तुमचंही मत जाणून घ्यायला नक्की आवडेल.
`मदर्स डे`बद्दल किंवा याच निमित्तानं तुम्हाला काय म्हणायचंय? आम्हाला नक्की कळवा...
खाली दिलेल्या कमेट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया लिहून आमच्यापर्यंत नक्की पोहचवा...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.