www.24taas.com, वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
आज प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळतो... त्यातल्या वेगवेगळ्या गॅझेट्सची मजा ही काही औरच असते... मग ही मजा करता-करता आपल्याला आपलं आरोग्य तपासता आलं तर... असंच एक गॅझेट टेक तंत्रज्ञांनी बनवलंय... याद्वारे तुम्ही आपलं कोलेस्ट्राल स्मार्टफोनच्या मदतीनंच तपासू शकता...
स्मार्टफोननं स्वतःचे फोटो काढा आणि फोटो क्लिक करून तब्येतही सांभाळा. आपला स्मार्टफोन वापरून कुणालाही कोलेस्ट्रॉल लेव्हल तपासता येणार आहे, असं एक डिव्हाईस तंत्रज्ञांनी तयार केलंय. स्मार्टफोन कोलेस्ट्रॉल अॅप्लिकेशन फॉर रॅपिड डायग्नोस्टिक, अर्थात `स्मार्टकार्ड` (smartcard) द्वारं एका मिनिटांत कोलेस्ट्रॉलची पातळी तपासता येऊ शकते, असा दावा कॉर्नेल विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे.
त्यासाठी आपल्या रक्ताचा एक थेंब, घाम किंवा लाळेतील बायो-मार्कर्स हे एवढंच यासाठी उपयोगी ठरू शकतं. ज्येष्ठ संशोधक डेव्हीड एरिक्सन यांनी आपल्या टीमसोबत एक गॅझेट तयार केलंय. जेव्हा कुणी व्यक्ती कोलेस्ट्रॉल टेस्ट स्ट्रिपवर रक्ताचा किंवा घामाचा थेंब टाकते, तेव्हा त्यावर काहीतरी रासायनिक प्रक्रिया होते. त्यानंतर ही स्ट्रिप मोबाइल अॅपद्वारं अभ्यासता येऊ शकते.
‘स्मार्टकार्ड` हे उपकरण मोबाइल कॅमेऱ्याच्या वर बसवलं जातं. बिल्ट-इन फ्लॅशमधून ते डिफ्युज्ड लाईट घेतं. त्यामुळं कोलेस्ट्रॉल टेस्ट स्ट्रिपवर प्रकाश पडतो. त्यानंतर त्या प्रतिमेचा रंग आणि सॅच्युरेशनल लेव्हल अॅप तपासतं आणि कोलेस्ट्रॉलची पातळी मोबाईल स्क्रिनवर झळकते. तसं तर `स्मार्टकार्ड` आजही बाजारात आणता येऊ शकतं. परंतु, त्यावर आणखी थोडा अभ्यास करून, ते अधिक अद्ययावत करून वर्षाच्या आतच मोबाईल बाजारपेठेत पाठवलं जाईल, असं एरिक्सन यांनी स्पष्ट केलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.