टपाल यंत्रणेतून तार, आता कायमची हद्दपार

मोबाइल, इंटरनेटच्या जमान्यात पत्र लिहिणं, तार पाठवणं या सारख्या गोष्टी कालबाह्य होऊ लागल्या हेत. त्यामुळे आता तार यंत्रणा बंद करण्याचा निर्णय भारत संचार निगमने घेतला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 13, 2013, 04:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई
मोबाइल, इंटरनेटच्या जमान्यात पत्र लिहिणं, तार पाठवणं या सारख्या गोष्टी कालबाह्य होऊ लागल्या हेत. त्यामुळे आता तार यंत्रणा बंद करण्याचा निर्णय भारत संचार निगमने घेतला आहे. १५ जुलैपासून १६० वर्षांची परंपरा असणारी तारेची परंपरा बंद करण्यात येत आहे.
गेली अनेक वर्षं महत्वाचा संदेश पाठवण्यासाठी, लवकरात लवकर निरोप पोहोचवण्यासाठी तारेचा वापर होत असे. तार ही अनेकांच्या प्रतिक्षेचा विषय असे. अनेक सुखदुःखाच्या बातम्या तारेमार्फतच मिळत असे. मात्र, आज तंत्रज्ञान एवढे पुढे गेले असताना तारेची गरज काय असा पवित्रा बीएसएनएलने घेतला आहे. तारेचे दर जास्त असून २०११ पासून ते अधिक वाढले होते.
गेली अनेक वर्षं निधनाच्या बातम्या, जन्माच्या बातम्या, लग्नाच्या शुभेच्छा यांचे छापील शुभसंदेश तसंच नोकरीतील पदोन्नतीच्या बातम्या कमीत कमी शब्दांत पोहोचवण्यासाठी तारयंत्रणेचा वापर केला जाई. तार येताच अनेकांच्या हृदयाचे ठोके वाढत असत. आतील बातमी ही शुभसंदेश देणारी आहे की शोकवार्ता याबद्दल मनात उत्कंठा असे.
टेलिफोनच्या विस्तारानंतर गावागावांतही तार पाठवण्याची पद्धत कमी होऊ लागली. मोबाइल आणि इंटरनेटमुळे आता तार यंत्रणेची गरज नसल्याचं म्हणत तार यंत्रणा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.