सावधान ! व्हॉटस् अॅपच्या ग्रुप अॅडमिनला अटक

तुम्ही ग्रुप व्हॉटस अॅपवर अॅडमिन असाल तर सावधान, कारण जोगेश्वरीतून एका व्हॉटस अॅप ग्रुपच्या अॅडमिनला अटक करण्यात आली आहे.

Updated: Jun 18, 2014, 03:25 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
तुम्ही ग्रुप व्हॉटस अॅपवर अॅडमिन असाल तर सावधान, कारण जोगेश्वरीतून एका व्हॉटस अॅप ग्रुपच्या अॅडमिनला अटक करण्यात आली आहे.
फेसबुकवर बीभत्स चित्र, मजकूर आणि व्हिडीओ पाठवण्याचं तरूणाईमध्ये सध्या फॅड आलेले आहे.
असा कोणताही फोटो जो आक्षेपार्ह असेल, ज्या फोटोमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या जातील, दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण होईल असा मजकूर प्रकाशित केला, तर ग्रुप अॅडमिनला जेलची हवा खावी लागणार आहे.
22 वर्षाचा तरूण खाणार जेलची हवा
शेख कलीम शेख सिराजोद्दीन या 22 वर्षाच्या तरूणावर ही वेळ आली आहे. कलीम शेखला औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील जोगेश्‍वरीत त्याला अटक करण्यात आली.
शेख कलीम हा वाळूज येथील मोटरसायकल शोरूममध्ये वसुलीचे काम करतो. तो एका कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाला आहे.
परस्पर सदस्य करणं भोवलं
कलीमने आपल्या मोबाईलवर व्हॉटस् अॅपचा एक ग्रुप बनवला होता. फेसबुक अकाऊंटमधील मित्रांना त्याने परस्पर सदस्य केलं होतं. यात फेसबुकवरही त्याचे बहुतांश मित्र हे अनोळखी होते.
चुनाभट्टी गांधीनगर येथे राहणाऱ्या अमन राऊतला रात्री अकरा वाजता, एका अनोळखी व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावरून मेसेज आला. त्यात एक विडंबनात्मक चित्र होते.
ते अमन राऊत याने आपला मित्र दिनेश बियाणी याला दाखवलं. सोमवारी ते आपल्या काही मित्रांसोबत क्रांतीचौक ठाण्यात गेले आणि तेथे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आणि तपासाला सुरूवात झाली
गुन्हे प्रकटीकरण पथकाने या प्रकरणाचा शोध सुरू केला, आणि ग्रुप अँडमिनचा शोध घेतला असता, तो जोगेश्‍वरीत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन शेख कलीम याला ताब्यात घेतलं.
कलीमची चौकशी करण्यात आली. व्हॉटस् अॅपवर ते चित्र राजस्थान येथील रोमिओ आसेफ या तरुणाने ग्रुपमध्ये टाकल्याचं कलीमने सांगितलं.
शेख कलीमचा रोमिओ हा फेसबुक मित्र आहे. विशेष म्हणजे कलीम त्याला प्रत्यक्ष कधी भेटलाही नाही, आणि त्याला ओळखत देखिल नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरूच राहणार आहे. ही लिंक राजस्थानपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
पुण्यात अशाच प्रकारानंतर हिंसा उसळली होती, या प्रकऱणी पोलिसांनी 18 जणांना ताब्यात घेतलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.