www.24taas.com, मुंबई
गुगल, ट्विटर आणि फेसबूकच्या गर्दीत तुम्हाला कधी याहू मेल आणि चॅटची आठवण झालीय का? नक्कीच तुमचं एखादं जुनं याहू अकाऊंट असू शकतं. पण, तुम्ही त्याकडे चुकून कधीतरी पाहत असाल... होय ना... याचीच जाणीव याहूला उशीरा का होईना पण झालीय. त्यासाठी याहूनं आपली याहू मॅसेन्जर ही चॅट सुविधाच बंद करण्याचा निर्णय घेतलाय. १४ डिसेंबर २०१२ पासून याहू मॅसेन्जर विंडोज मेसेन्जरमध्ये विलीन होणार आहे.
सोशल साईटसच्या भाऊगर्दीत याहू सध्या हरवल्याचंच चित्र दिसतंय. त्यामुळे आता आपल्या सुविधांमध्ये बदल करून आणखी चांगल्या सुविधा यूजर्सना देण्याचं याहूनं ठरवलंय. त्यासाठीच काही दिवसांपूर्वी याहूनं ‘गुगल’च्या मारिसा मेयर या ३७ वर्षीय महिला इंजिनिअरला आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतलंय. यूजर्सला नवीन काही देण्याच्या अगोदर याहूनं आपले चालत नसलेली वेब दुकानं बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे चॅट हब, विषयांचे वर्गीकरण, देश,शहरे यांची विभागणी असलेले चॅट आता बंद होणार आहे.
याहू लवकरच आपली ` न्यू टीव्ही ` नावाची ‘व्हिडिओ चॅट’ सुविधा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ‘ग्रुप चॅट’चाही यामध्ये समावेश करण्यात आलाय. यासाठी ` ऑन द एअर ` नावाची कंपनी याहूनं विकत घेतलीय. तसंच आपल्या नव्या सुविधेसाठी याहूने मोठी गुंतवणूक केली असून चीनमधील ‘अलिबाबा डॉट कॉम’ या कंपनीशीही त्यांनी करार केलाय. मायर यांच्या नियोजित प्रोजेक्टमध्ये वेबसाइटपेक्षाही मोबाइलवरील सुविधांकडे विशेष लक्ष पुरविण्यात आले आहे.