www.24taas.com, झी मीडिया, महाड
महाडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री सदस्य परिवाराचे आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांचा गौरव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आप्पासाहेबांचा नागरी सत्कार करुन आणि सचिनदादांना रायगड भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.
आळस सोडा, त्याच्यापासून दूर राहा, श्रवण भक्ती ही श्रेष्ठ भक्ती असल्याचा गुरूमंत्र या वेळी सचिनदादा धर्माधिकारी यांनी दिला. यावेळी मैदानात सुमारे १५ लाख श्री सदस्य उपस्थित होते. गेल्या दोन दिवसांपासून येणार्या श्री सदस्यांचा ओघ कार्यक्रम संपल्यानंतरही सुरू होता.
भविष्यात आपल्याला देशात आणि राज्यात भ्रष्टाचार साफ करायचा आहे. त्यासाठी तीर्थरुप आप्पासाहेबांनी आम्हाला मार्गदर्शन करावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. आमशेत येथे तीर्थरुप आप्पासाहेब धर्माधिकारी आणि धर्माधिकारी कुटुंबीयांच्या नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी सचिनदादा धर्माधिकारी यांना `रायगड भूषण` पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
धर्माधिकारी कुटुंब अध्यात्माच्या माध्यमातून देश घडवण्याचे काम करत असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी सांगितले. देशातील भ्रष्टाचार संपुष्टात आणायचा आहे. देशातील महिला असुरक्षित आहेत. हे वातावरण आपल्याला बदलायचे आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना स्वामी सर्मथांचे मार्गदर्शन घेतले होते. तसेच मार्गदर्शन आम्हाला ‘आप्पासाहेब धर्माधिकारी’ यांनी करावे. देशाचा सर्वोच्च पुरस्कारही कमी पडावा असा हा सोहळा आहे. असे यावेळी ठाकरे यांनी सांगितले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.