दहावी, बारावीच्या परीक्षेत डमी विद्यार्थी

कल्याण पूर्वेतल्या चिंचपाडा भागातील साकेत महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ शिक्षण संस्थेच्या परीक्षा सुरु आहेत. या परीक्षेमध्ये चक्क डमी विद्यार्थ्यांना, दहावी आणि बारावीची परीक्षा देण्यासाठी बसवल्याचं उघड झालंय. 

Updated: Apr 29, 2016, 08:16 AM IST
दहावी, बारावीच्या परीक्षेत डमी विद्यार्थी title=

कल्याण : कल्याण पूर्वेतल्या चिंचपाडा भागातील साकेत महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ शिक्षण संस्थेच्या परीक्षा सुरु आहेत. या परीक्षेमध्ये चक्क डमी विद्यार्थ्यांना, दहावी आणि बारावीची परीक्षा देण्यासाठी बसवल्याचं उघड झालंय. 

समाजसेविका दर्शना राणे यांनी कल्याणमधल्या साकेत महाविद्यालयावर धडक दिली. तेव्हा पाच डमी विद्यार्थी राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेची दहावी, बारावीची परीक्षा देत असलेले त्यांना आढळून आलं. यात दोन मुलींचाही समावेश होता. या कारस्थानामध्ये विजय पाल नावाच्या व्यक्तीचा समावेश असल्याचं समोर आलंय. पोलिसांनी या डमी विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरु केलीय. 

पाचही डमी विद्यार्थी दुसऱ्याचा पेपर देत होते. त्या पैकी काही जणांकडे परीक्षेचे हॉल तिकीटही नव्हतं. यात ४० वर्ष वयाची व्यक्ती डमी विद्यार्थी म्हणून परीक्षा देत होती. 
 
दरम्यान, या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं सांगत साकेत महाविद्यालयानं हात वर केले आहेत. यामध्ये आमच्या कॉलेजची काही चूक नसून या प्रकरणाशी कॉलेजचे काही घेणे देणे नाही. साकेत कॉलेज हे फक्त परीक्षेसाठी सेंटर ठेवण्यात आले होते, असे कॉलेजच्या प्राचार्यांचे म्हणणे आहे. 

या प्रकरणानंतर कोणाचंही नियंत्रण नसणाऱ्या मुक्त विद्यापीठांचा दर्जा, कारभार, तसंच ते घेत असलेल्या परीक्षांवर या निमित्तानं पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.