अनधिकृत बांधकामांना जितेंद्र आव्हाडांचा आशिर्वाद

ठाण्यातल्या अनधिकृत बांधकामांना आमदार जितेंद्र आव्हाड यांचाही आशिर्वाद असल्याचं समोर आलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 10, 2013, 03:30 PM IST

www.24taas.com, ठाणे
ठाण्यातल्या अनधिकृत बांधकामांना आमदार जितेंद्र आव्हाड यांचाही आशीर्वाद असल्याचं समोर आलंय. ठाण्याजवळच्या गोठेघर आणि डायघर इथल्या वन विभागाच्या जमिनीवर असलेली अनधिकृत बांधकामं पाडणा-या वनाधिका-यांच्या कामात आव्हाड यांनी अडथळा आणण्यासाठी 2011 मध्ये जितेंद्र आव्हाडांनी फोनवरून अर्वाच्य भाषा वापरून कारवाई करणा-या अधिका-यांना धमक्या दिल्याचं या पत्रात म्हटलंय.
शिळफाट्यात बिल्डिंग दुर्घटनेत 74 बळी गेल्यानंतर याचं खापर अधिका-यांवर फोडणारे हे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड.. अनधिकृत बिल्डिंगला अधिकारीच कसे जबाबदार आहेत हे ते अधिक आक्रमक पणे मांडतायेत.. पण याची दुसरी बाजूही आम्ही आता तुम्हाला दाखवतो..ही दुर्घटना घडली, त्याच परिसरात जेव्हा दीड वर्षांपूर्वी वनखात्याचे अधिकारी अनधिकृत बाँधकाम रोखण्यासाठी गेले, तेव्हा याच आव्हाड महाशयांनी त्यांना अर्वाच्य भाषेत रोखल्याचं पत्र खुद्द वनखात्याच्या अधिका-यांनीच अप्पर सचिवांना पाठवले होते. हे पत्र म्हणजे आहे..ज्यात लोकप्रतिनिधी अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करणा-या अधिका-यांना कसे रोखतात याचा हा ढळढळीत पुरावा..

इथे आव्हाड गोरगरिबांची बाजू घेतल्याचा आव आणतात खरे.. पण शिळफाटा बिल्डिग दुर्घटनेत त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकाला झालेली अटक अनधिकृत बिल्डिंग बांधतानाही राजकारण्यांचा कसा सहभाग असतो, याचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे बिल्डिंग बांधताना बिल्डरला अभय द्यायचं, आणि त्यात रहिवासी रहायला आले की सर्वसामान्यांच्या बाजूंनं उभं रहायचं नाटक करुन अधिका-यांना रोखायचं आणि त्यातून व्होट बँकेचं गँणितही पक्क करायचं.. अशी ही साखळी आहे.. आणि एखादी दुर्घटना घडली की पुन्हा अधिका-यांवर खापरं फोडून, आम्ही नाही त्यातले हे सांगायलाही ही नेतेमंडळी मोकळीच..