राज ठाकरेंच्या आदेशांचं झालं काय?

कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत निवडणुकीपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बरीच अश्वासनं दिली होती. मात्र गेल्या दोन वर्षांत मनसेच्या नगरसेवकांकडून कुठल्याच अश्वासनांची पूर्तता झाली नसल्याचं दिसून आलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 8, 2013, 06:11 PM IST

www.24taas.com, कल्याण
कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत निवडणुकीपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बरीच अश्वासनं दिली होती. मात्र गेल्या दोन वर्षांत मनसेच्या नगरसेवकांकडून कुठल्याच अश्वासनांची पूर्तता झाली नसल्याचं दिसून आलं आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत जोरदार भाषणं केली होती. यावेळी अनेक अश्वासनं देत कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या. वाढदिवसाची होर्डिंग्ज लावली जाऊ नयेत, रस्त्यांना पेव्हर ब्लॉक लागता कामा नयेत अशा सूचना राज ठाकरेंनी दिल्या होत्या. तसंच डोंबिवलीत सुसज्ज वाचनालयाचं अश्वासनही डोंबिवलीकरांना दिलं होतं. मात्र राज ठाकरेंनी म्हटल्याप्रमाणे शहराचा कायापालट झालाच नाही.
कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेचे २८ नगरसेवक आहेत. मात्र, या नगरसेवकांनी राज ठाकरेंच्या कुठल्याच आदेशाचं पालन केल्याचं दिसत नाही. सुसज्ज ग्रंथालयाचं काम बंद पडलं आहे. याबद्दल मनसे नगरसेवकांनी कुठलीच ठाम भूमिका घेतली नाही. कल्याण-डोंबिवलीमध्ये सर्वत्र पेव्हर ब्लॉक बसवण्याचं काम चालू आहे. त्यालाही मनसे नगरसेवक विरोध करत नाहीत. अनेक ठिकाणी नगरसेवकांच्या वाढदिवसांची होर्डिंग्ज लागलेली दिसतात.

सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवण्यात मनसेचे नगरसेवक पुरे पडले नाहीत. त्यामुळे मनसेचे नगरसेवक नेमकं काय करत आहेत, हाच प्रश्न कल्याणकर आणि डोंबिवलीकरांना पडला आहे.