www.24taas.com, झी मीडिया, कल्याण
कल्याण, डोंबिवली, शिळफाटा परिसरात गेले तीन दिवस पाईपलाईन फुटण्याचे प्रकार सुरुच आहेत. सतत पाईपलाईन फुटत असल्यानं परिसरात हजारो लिटर पाण्याची नासाडी तर झालीच आहे, शिवाय वीजपुरवठाही वारंवार खंडित होतोय. अधिकारी मात्र रविवारची सुट्टी एन्जॉय करण्याच्याच मूडमध्ये आहेत.
मध्यरात्रीच्या सुमारास कल्याणच्या तिसगाव नाका परिसरातील कर्पेवाडी रोडवरची ८ इंचाची पाईपलाईन फुटली. मात्र घटनेबाबत ब-याचदा कळवूनही रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यात मग्न असलेले महापालिकेचे कर्मचारी याठिकाणी फिरकलेच नाही. त्यामुळे व्हायचं तेच झालं. लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. याचा परिणाम म्हणून पाणीकपात करण्यात आली. परिसरातल्या महिलांना आता पाण्यासाठी भटकावं लागतंय. महापौरांच्याच प्रभागातल्या महिलांना गटाराच्या शेजारील फुटलेल्या पाईपलाईनमधून असं पाणी भरावं लागतंय. दुसरीकडे कोळसेवाडीतल्या महिलांना पाणी भरण्यासाठी उन्हातानात पायपीट करून रेल्वे वसाहतीत जावं लागतंय.
ज्या ठिकाणी ही पाईपलाईन फुटली तिथून हाकेच्या अंतरावर महापौर कल्याणी पाटील राहतात. त्यांच्याकडे या प्रभागातील महिलांनी गा-हाणं मांडलं. पण, त्यांनीही दाद दिली नाही. निवडून आल्यानंतर होर्डिंगबाजी करणा-या महापौरांना आता आमचा विसर पडलाय, असा आरोप या प्रभागातल्या महिलांनी केला.
कल्याण पूर्वेत मुबलक पाणीपुरवठा असूनही महापालिकेची ढिसाळ वितरण व्यवस्था, अनधिकृत नळ जोडणीवर नसलेलं नियंत्रण, तसंच पाईपलाईन फुटण्याच्या वाढत्या घटना यामुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावं लागतंय. प्रत्येक वेळी कारवाईचं आश्वासन देणारे आयुक्त रामनाथ सोनावणे यावेळी तरी खरोखरच कारवाई करतात का, की यापुढेही असाच अनागोंदी कारभार सुरू राहतो, एवढच फक्त बघायचंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.