शिवसेना नेते मोहन राऊत यांची गोळ्या झाडून हत्या

बदलापूर शिवसेनेचे उपशहरप्रमुख आणि माजी नगरसेवक मोहन राऊत यांची शुक्रवारी सकाळी गोळ्या झाडून हत्या झालीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 24, 2014, 02:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बदलापूर
बदलापूर शिवसेनेचे उपशहरप्रमुख आणि माजी नगरसेवक मोहन राऊत यांची शुक्रवारी सकाळी गोळ्या झाडून हत्या झालीय. यामुळे शहरात तणावाचं वातावरण आहे. हत्येच्या निषेधार्थ बदलापूरात आज कडकडीत बंद पाळण्यात आलाय. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरेंसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
शुक्रवारी, सकाळी पावणे दहाच्या सुमारास मोहन राऊत कात्रप भागात आपली वहिनी नगरसेविका शितल राऊत यांच्या कार्यालयात बसले होते. त्यावेळी दोन अज्ञात इसमांनी तिथं घुसून राऊत यांच्यावर बेछूट गोळीबार केला. हल्लेखोरांनी एकूण सात राउंड फायर केले. यातल्या पाच गोळ्या राऊत यांच्या पोटात शिरल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना डोंबिवलीच्या एम्स रुग्णालय नेण्यात आलं. मात्र, तिथं डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केलं. मारेकरी तोंडाला रुमाल बांधून आल्याचं प्रत्यक्षदेर्शींनी सांगितलंय.
या घटनेमुळे बदलापुरात तणावाचं वातावरण आहे. हत्येच्या निषेधार्थ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय. दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष योगेश राऊत यांच्यावर गोळीबार झाला. त्याच्या एक दिवस आधी, होळीच्या दिवशी पप्पू बागुल या गुंडानं संतोष साळवी या तरुणाची गोळ्या झाडून हत्या केली. वर्षभरापूर्वी भाजपचे नेते शरद म्हात्रे यांच्यावर गोळीबार झाला होता. सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या बदलापूरमध्ये गुंडगिरीचे प्रकार वाढत असल्याचं यावरून स्पष्ट होतंय. शहराची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलिसांना अपयश येत असल्याची टीका होतेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.