सेना आमदार सरनाईक अडकले पाणीचोरीच्या आरोपात?

ठाण्यातल्या विहंग व्हॅलीच्या पाणीचोरीवरुन पालिका आयुक्त आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यात चांगलीच जुंपलीय.

Updated: Nov 1, 2012, 11:47 PM IST

www.24taas.com, ठाणे
ठाण्यातल्या विहंग व्हॅलीच्या पाणीचोरीवरुन पालिका आयुक्त आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यात चांगलीच जुंपलीय. या प्रकरणातील पुरावे आयुक्तांनी पोलिसांना सादर केल्यानं 100 कोटींचा दावा दाखल करणारे प्रताप सरनाईक सध्या बॅकफूटवर गेलेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तांविरोधात 100 कोटींचा दावा दाखल करुन आयुक्तांना दबाव टाकण्याचा प्रयत्न केला खरा.
परंतु यामुळं आयुक्त आर.ए.राजीव अधिकच आक्रमक झालेले दिसून आले. आमदार सरनाईकांच्या घोडबंदर रोडवरील विहंग व्हॅली प्रकल्पानं अनधिकृत नळजोडणीच्या माध्यमातून पाणीचोरी केल्याच्या मतावर ते अजूनही ठाम आहेत. यासाठी त्यांनी या प्रकरणाच्या अधिक खोलात जाऊन आणखी पुरावे गोळा करून पोलिसांना सादर केलेत. त्यामुळं प्रताप सरनाईक तर अडचणीत आले आहेतच याशिवाय त्यांच्या पाणीचोरीची पाठराखण करणारे ठाण्यातले शिवसेना नेतेही तोंडावर पडल्याचं चित्र निर्माण झालंय.
सध्या तरी आयुक्त आणि शिवसेना आमदारांच्या या लढाईत आयुक्तांचे पारडं चांगलच जड दिसतंय. त्यामुळंच कि काय आयुक्तांविरोधात सुरुवातीला आक्रमकपणे भूमिका घेणारे प्रताप सरनाईक आरोपांना सामोरं जाण्याऐवजी सध्या परदेशात गेलेत.