ठाणे दुर्घटना, आठ जणांना अटक

मुंब्रा येथे जमीनदोस्त झालेल्या आणि ७४ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अनधिकृत इमारतीचा फरार बिल्डर जमीर शेख, जब्बार पटेल यांना अटक केल्यानंचतर दीपक चव्हाण यालाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई क्राईम बॅंचने केली आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्यांचा आकडा आठवर गेला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 7, 2013, 08:11 AM IST

www.24taas.com, ठाणे
मुंब्रा येथे जमीनदोस्त झालेल्या आणि ७४ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अनधिकृत इमारतीचा फरार बिल्डर जमीर शेख, जब्बार पटेल यांना अटक केल्यानंचतर दीपक चव्हाण यालाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई क्राईम बॅंचने केली आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्यांचा आकडा आठवर गेला आहे.
फरार बिल्डरचा साथीदार सलीम शेख यालाही मुंबईमधून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. इमारत कोसळताच जमीर शेख आपल्या उत्तर प्रदेशातल्या गावाला पळून गेला होता. उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगरमध्ये जाऊन मुंब्रा पोलीसांनी त्याला अटक केली आहे.

मुंब्र्यानजीकच्या शीळफाट्याजवळ गुरुवारी कोसळलेल्या लकी कंपाउंडमधल्या या सात मजली इमारतीखाली बळी गेलेल्यांचा आकडा आता ७४ वर पोचला असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेत ६२ जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी ठाणे महापालिकेचे उपायुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित चव्हाण यांना आज अटक केली.
या दुर्घटनेतील मृताच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपये तर गंभीररीत्या जखमी झालेल्यांना ५० हजारांची मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. ढिगार्‍याखाली अडकलेल्या एकाच कुटुंबातील तब्बल १५ जणांचा २७ तासांनंतरही कुठलाही थांगपत्ता लागला नव्हता. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर इरफान सिद्दिकी हा त्याची आई, दोन भाऊ, बहीण, भावजया आणि सहा लहान मुलांसह राहत होता. त्यातील तिघांना सुखरूप बाहेर काढले असून, भावजय तसलिमा हिचा मृत्यू झाला. मात्र, आणखी १५ जणांचा २७ तासांनंतरही ठावठिकाणा लागला नव्हता.