www.24taas.com, ठाणे
शिळफाटा बिल्डिंग दुर्घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ९ जणांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बिल्डिंग मटेरियल सप्लायर अफराज याला आज सकाळी अटक करण्यात आली.
याखेरीज दोन्ही बिल्डर्स जमील कुरेशी आणि सलीम शेख यांच्यासह ठाणे महापालिकेचे निलंबित उपायुक्त दीपक चव्हाण आणि त्यांचा साथीदार जब्बार पटेल, बाळासाहेब आंधळे, राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थानिक नगरसेवक हिरा पाटील, एएसआय सय्यद, माजी अतिरीक्त आयुक्त थोरबोले आणि ठाणे पालिकेचा क्लार्क किसन मडके यांना अटक करण्यात आलीय.
या सर्व आरोपींना ठाण्यातल्या बारा बंगला परिसरात न्यायमुर्ती वॉरियर्स यांच्या बंगल्यावर हजर करण्यात आलंय. दीपक चव्हाणच्या घरातून पोलीसांनी ५ लाखांची रोकड आणी काही महत्वाची कागदपत्र जप्त केलीत.. गृहमंत्री आर आर पाटील यांनी या सर्वांची कसून चौकशी करण्याच्या सूचना पोलीसांना दिल्यात.
ठाण्यातल्या अनधिकृत इमारतीने ७४ जणांचा बळी घेतलाय. त्यामुळे अनेकांसाठी यमदूत ठरलेल्या बिल्डरांना जास्तीत जास्त कडक शिक्षेची चोहोबाजुने मागणी होतंय. मात्र या बिल्डरांना सध्याच्या कायद्यानुसार १० वर्षांपर्यंतच शिक्षा होऊ शकते. त्यामुळं दोषींना कडक शिक्षेसाठी या कायद्यात बदल करण्याची मागणी कायदेतज्ज्ञांकडून होतंय.
शिळफाट्यामधल्या लकी कम्पाऊंडच्या अनाधिकृत इमारतीचा बिल्डर जमाल कुरेशीची डायरी पोलिसांनी ताब्यात घेतलीय. सुत्रांनी `झी २४तास` ला ही माहिती दिलीय. या डायरीमध्ये जमाल कुरेशीनं कुणाला किती रुपये याची नोंद आहे. हिरा पाटील आणि दीपक चव्हाण यांना प्रत्येक स्लॅबमागे एक लाख रुपये दिले आहेत अशी माहिती आहे. दीपक चव्हाणला सात लाख रुपये दिल्याची माहितीही सुत्रांनी `झी २४तास` ला दिलीय. हिरा पाटील आणि दीपक चव्हाण या दोघांनाही या प्रकरणात यापूर्वीच त्यांनी अटक केलीय.