कल्याण तिहेरी हत्याकांड, मुलानंच केली हत्या?

कल्याण तिहेरी हत्याकांडामध्ये खळबळजनक माहिती उघड झालीये. मुलानंच जन्मदात्या आईवडिलांचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याचं उघडकीस आलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 14, 2013, 07:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कल्याण
दसऱ्याच्या संध्याकाळीच एकाच कुटुंबातील तिहेरी हत्याकांडामुळं कल्याण शहर हादरून गेलंय. कल्याणच्या आग्रा रोड इथल्या गणपती चौकातील मयुरेश बिल्डींगमध्ये आई-वडील आणि २९ वर्षीय मुलाचे मृतदेह सापडले. या विचित्र हत्याकांडाचं गूढ आता उकललं असून, मुलानंच आपल्या आईवडिलांची हत्या करून स्वतःही आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय.
संपूर्ण देशभरात दसऱ्याचा सण आनंदात साजरा होत असताना कल्याणच्या गणपती चौकातील मयुरेश बिल्डींगमध्ये तिहेरी हत्याकांडाची घटना घडली. चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या वानखेडे कुटुंबातील ६७ वर्षीय सुभाष वानखेडे, त्यांची ५६ वर्षीय पत्नी प्रमोदिनी आणि २९ वर्षीय मुलगा ज्ञानेश्वर यांची हत्या झाली होती. वानखेडे पती-पत्नीचे हातपाय चिकटपट्टी आणि टॉवेलनं बांधलेलं होतं. तर मुलगा ज्ञानेश्वर याच्या तोंडाभोवती प्लास्टिकची पिशवी बांधलेली होती आणि त्या पिशवीत कार्बनडाय ऑक्साईड गॅस सिलेंडरचा पाईप टाकलेला होता.
विशेष म्हणजे या तिहेरी हत्याकांडाच्या २० मिनिटं आधी मुलगा ज्ञानेश्वर यानं कल्याणच्या पोलीस नियंत्रण कक्षात फोन केला होता. तसंच जवळच्या नातेवाईकांना एसएमएस देखील केले होते. घरात चोर घुसलेत, कृपया मदत करा, अशा आशयाचे हे एसएमएस होते. परंतु पोलीस घरी पोहोचले तेव्हा घरात तिघांचेही मृतदेह आढळले. मात्र घरातील सोन्याचे दागदागिने चोरीला गेलेले नव्हते. मग हे विचित्र हत्याकांड का आणि कसे घडले, याचे कोडे कल्याण बाजारपेठ पोलीस आणि क्राईम ब्रँचला पडलं.
परंतु अवघ्या काही तासातच पोलिसांनी हे गूढ उकललं. ज्ञानेश्वर हा पवई तील आयआयटी इथं टेक्निशियन म्हणून काम करतो. त्यानंच आईवडिलांची हत्या केली आणि नंतर स्वतः आत्महत्या केल्याचं तपासात उघड झालं. आपलं लग्न होत नसल्यानं संतापाच्या भरात त्यानं आईवडिलांची हत्या केली. लग्नासाठी आलेल्या मुलींच्या स्थळांना आई नकार देत असल्यानं ज्ञानेश्वरनं हे टोकाचं पाऊल उचललं, असं तपासात आढळलं. त्यामुळं सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.