www.24taas.com, नागपूर
विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विरोधकांचं टार्गेट बनले. विरोधकांना उत्तर देताना ‘शपथ घेतानाच का नाही विरोध केला’ असा प्रश्न अजितदादांनी केलाय.
हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस अपेक्षेप्रमाणे गाजला तो अजित पवारांच्या विरोधानं... सकाळीच अजित पवारांच्या निषेधाचे फलक हातात घेऊन विरोधकांचा मूकमोर्चा विधानभवन परिसरात दाखल झाला. विधानसभेत कामकाज सुरु होताच उपमुख्यमंत्रीपद हे घटनात्मक पद नाही असा आक्षेप घेत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची घेतलेली शपथ ही घटनाबाह्य असल्याचा दावा विरोधकांनी केला. त्यामुळे अजित पवार यांचा विधानसभेत होणारा परिचयाचा कार्यक्रम झालाच नाही. अजितदादांविरोधात आपण या अधिवेशनात आक्रमक राहणार असल्याची चुणूक विरोधकांनी पहिल्याच दिवशी दाखवून दिली. यावेळी अजितदादांचा बचाव करण्यासाठी आबा पुढे सरसावले. १९९५ साली म्हणजे १७ वर्षांपूर्वी विरोधी पक्षात असताना आर. आर. पाटील यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या उपमुख्यमंत्रीपदाला अशाच प्रकारे विरोध केला होता. मात्र, त्यावेळी आपली चूक झाली होती अशी कबुली देत विरोधकांना चिमटा काढण्याचा प्रयत्न आबांनी केला. विरोधकांनी उपमुख्यमंत्रीपदाबाबत उपस्थित केलेला आक्षेप राष्ट्रवादीने फेटाळून लावला आहे.
पुन्हा मंत्रिमंडळात प्रवेश केलेल्या अजित पवारांची विधान परिषदेत सभागृहनेते म्हणून निवड करण्यात आली. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर, शंकरराव जगताप, माजी मंत्री प्रभाकर कुंटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यामुळे पहिल्याच दिवशी विरोधकांनी आपला आक्रमकपणा म्यान केला होता. आता मंगळवारपासून खऱ्या अर्थाने विरोधकांच्या आक्रमकपणाला सत्ताधाऱ्यांना तोंड द्यावे लागणार आहे.