www.24taas.com, मुंबई
विधानभवनाच्या परिसरात पोलीस अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या घटनेचा सर्वच पक्षांनी केलाय. परंतू, आमदार विरुद्ध पोलीस संघर्ष शिगेला पोहचल्याचं चित्र सध्या विधानभवनाबाहेर दिसून येतंय.
‘विधानसभेच्या आवारात पोलिसाला झालेल्या मारहाणीचा सर्वच राजकीय पक्षांनी निषेध केलाय. कुणालाही मारहाण करणं समर्थनीय होणार नाही. या प्रकरणावर विधिमंडळात निश्चितपणे चर्चा होईल. आणि दोषींवर कारवाई करण्याचा निर्णयही घेतला जाईल, हीच आमची अपेक्षा आहे’ असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय.
राम कदम, वीरेंद्र जगताप, क्षितीज ठाकूर, प्रदीप जैस्वाल, राजन साळवी, जयकुमार रावल यांनी पोलीस निरिक्षक सचिन सूर्यवंशी यांना चांगलीच मारहाण केलीय. या घटनेनंतर पोलीस दलातून मात्र संताप व्यक्त झालाय. संतप्त झालेले पोलीस अधिकाऱ्यांनी महासंचालकांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतलीय. दोषी आमदारांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी त्यांनी केलीय.
सांगलीतही उमटले पडसाद
दरम्यान, या घटनेचे पडसाद सांगलीतही उमटले आहेत. मारहाण झालेले पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी हे मूळचे सांगली जिल्ह्यातील पळूसचे आहेत. सूर्यवंशी यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी पळूस-बांबवडे मार्गावर रास्ता रोको केला. त्यामुळे काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती.