खरेदी करा, वापरा आणि परत करा...

ब्रिटनमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणानुसार एक धम्माल गोष्ट पुढे आलीय. या सर्वेक्षणानुसार, अनेक स्त्रिया महागडी वस्त्र खरेदी करतात, तेही फक्त एका दिवसापुरतं वापरण्यासाठी... आत्ता तुम्ही म्हणाल या महागाईच्या दिवसांत हे कसं शक्य आहे? तर या प्रश्नावरही काही स्त्रियांनी उपाय शोधून काढलाय.

Updated: Jun 12, 2012, 09:21 AM IST

www.24taas.com, लंडन  

 

ब्रिटनमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणानुसार एक धम्माल गोष्ट पुढे आलीय. या सर्वेक्षणानुसार, अनेक स्त्रिया महागडी वस्त्र खरेदी करतात, तेही फक्त एका दिवसापुरतं वापरण्यासाठी... आत्ता तुम्ही म्हणाल या महागाईच्या दिवसांत हे कसं शक्य आहे? तर या प्रश्नावरही काही स्त्रियांनी उपाय शोधून काढलाय. त्या महागडे, फॅशनेबल ड्रेस खरेदी तर करतात पण, एका दिवसापुरते (बहुतेकदा रात्रीपुरते) वापरून दुसऱ्या दिवशी त्या ही वस्त्र दुकानदारांना परत करतात. प्रत्येक ८ महिलांमागे १ महिला असं करताना या सर्वेक्षणातून दिसून आलंय.

 

अभ्यासकांच्या मते, हा आकडा आणखी खूप मोठा असू शकतो. कारण, अनेक स्त्रिया असं करतात जरूर पण, हे मान्य करायला त्या सहजासहजी तयार नसतात. ज्या महिलांनी हे मान्य केलंय, त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त महिलांच्या म्हणण्यानुसार, सध्याची ढासळलेली आर्थिक व्यवस्था यासाठी कारणीभूत ठरलीय. सध्याच्या महागड्या काळात लेटेस्ट, फॅशनेबल कपडे घेण्याची आर्थिक परिस्थिती नसल्यानं त्या असं करण्यासाठी प्रेरित होतात. तर १८ टक्के स्त्रियांना असं करण्यात आनंद मिळतो, म्हणून त्या असं करतात.

 

ब्रिटनमध्ये झालेल्या या सर्व्हेत २००० महिलांचा समावेश केला गेला. विवाह सोहळ्यांसाठी महागडे कपडे खरेदी करून ती वापरून दुकानदारांना परत करण्याची फॅशन जोरात असल्याचं यावेळी सर्वेमध्ये आढळून आलं. ब्लॅक-टाय डे किंवा ख्रिसमस पार्टीसाठीही हीच पद्धत वापरली जात असल्यांचही अभ्यासक सांगतात.

 

.