www.24taas.com , पुणे
भारताने पुन्हा संगणक क्रांती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने पावलं टाकली आहेत. भविष्यात भारत जगावर राज्य करेल, असे भाकीत करण्यात आले आहे. त्याला आता काहीप्रमाणात यश येत आहे. संगणक क्षेत्रात भारताचे दमदार पाऊल पडले आहे. आता तर सुपर कम्प्युटरच्या कैक पटीने मजल मारणारा महासुपर संगणक ('एक्झाफ्लॉप' ) तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यातील माहिती-तंत्रज्ञानाचा चेहरामोहरा बदलू शकणार आहे.
पुण्यातील ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी काही वर्षांपूर्वी सुपर कम्प्युटर तयार केला होता. आता तर आणखी एक पाऊल टाकून महासुपर संगणक बनविण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. हा महासुपर संगणक एका सेकंदात एकावर १८ शून्य इतकी प्रचंड गणिती प्रक्रिया करू शकणार आहे.
डॉ. विजय भटकर यांनी गेल्या वर्षी या संदर्भातील प्रस्ताव सादर केला होता. राष्ट्रीय सायन्स काँग्रेसच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केल्याचे जाहीर केले. पुण्यातील सी-डॅक आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्या पुढाकाराने, तसेच देशभरातील विविध नावाजलेली विद्यापिठ, प्रयोगशाळा यांच्या सहयोगाने हे संशोधन केले जाणार आहे. केंद्र सरकारने त्यासाठी ५ हजार कोटींची तरतूद केली आहे, हा महासुपर संगणक २0१८ पर्यंत तो बनविण्याचे लक्ष भारताने ठेवले आहे.
उच्चतम दर्जाचे सुपर कम्प्युटर बनविण्यासाठी स्पर्धा जगभरात सुरू आहे. अमेरिका, जपान, चीन व युरोप ही राष्ट्रे सध्या या स्पर्धेत आहेत. सध्या एका सेकंदात एकावर १५ शून्य इतक्या वेगाने गणिती प्रक्रिया करणारे टेटाफ्लॉप सुपर कम्प्युटर बनविण्यात यश आले आहे. त्याच्यापेक्षा १ हजार कोटींनी हा कम्प्युटर पुढे असेल, अशी माहिती डॉ. विजय भटकर यांनी दिली.
२0१0मध्ये चीनने सुपर पॉवर कम्प्युटर तयार केला आहे. त्यामुळे भारताची २००७पर्यंत जी आघाजी होती तिला धक्का पोहचला. आता चीनला मागे टाकण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. १९९८ मध्ये भारताने स्वबळावर परमसंगणक बनविला. या परमसंगणकाची एका सेकंदात एक अब्ज गणिती प्रक्रिया करण्याची क्षमता होती. आता भारताने ज्या महासुपर कम्प्युटरसाठी कंबर कसली आहे, त्याची क्षमता याच्यापेक्षा १० लाख पट इतकी प्रचंड असेल, असे डॉ. भटकर यांनी स्पष्ट केले आहे.