मुंबई : तुम्ही पुलिंगी किंवा स्त्रीलिंगी भेद दर्शवणारे शब्द वापरता का? उदाहरणार्थ, महापौर किंवा राष्ट्रपती. तुम्ही इंग्लंडमध्ये विद्यार्थी असाल आणि मॅनकाइंड, लेमॅन असे इंग्रजी शब्द तुमच्या निबंधात किंवा उत्तरपत्रिकेत वापरलेत, तर तुमचे मार्क आता थेट कापले जाणार आहेत. ब्रिटनच्या फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशननं याबाबत विद्यापीठांना विनंती केली होती. त्याला प्रतिसाद देत हल युनिव्हर्सिटी, बाथ युनिव्हर्सिटी, कार्डिफ मॅट्रोपोलिटन युनिव्हर्सिटी या प्रतिष्ठित विद्यापीठांनी विद्यार्थ्यांसाठी निर्देश दिलेत.
'भाषा ही महत्त्वाची आणि प्रतिकात्मक असते. त्यामुळे लिंगदर्शी शब्दांचा वापर टाळावा' असं FOIनं आपल्या आवाहनात म्हटलंय. याला ब्रिटनमधल्या काही परंपरावादींनी अर्थातच विरोध केला असला, तरी स्त्री-पुरूष समानतेचा वापर भाषेपासून सुरू व्हायला हवा याला पुष्टी देणारी ही घटना आहे. मराठीमध्येदेखील असे अनेक शब्द आहेत. या शब्दांचाही विचार करण्याची वेळ आली आहे का, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होते आहे.