मुंबई : अॅपलचा बहुचर्चित आयफोन एसई शुक्रवारी ८ एप्रिलला भारतात दाखल होणार आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेत लाँच झाल्यापासून त्याची आयफोन चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा होती.
भारतात हा फोन कितीला मिळणार याची सर्वांना उत्सुकता होती. तो लाँच झाला तेव्हा त्याची किंमत ३०,००० रुपये असेल असं सांगण्यात आलं होतं. मात्र, ती सांगण्यात झालेली चूक होती असं कंपनीतर्फे सांगण्यात आलं. हा फोन आता ३९,००० रुपयांना मिळणार आहे.
बीटेल टेलिटेक आणि रेडिंग्टन या कंपन्यांतर्फे हा फोन भारतभर विकला जाणार आहे.
चार इंचाची स्क्रीन असणारा हा फोन स्टेनलेस स्टीलच्या बॉडीसोबत मिळणार आहे. यात अतिशय जलद असा A9 प्रोसेसर दिला गेला आहे. अॅपलचं खास फिंगप्रिंट स्कॅनिंग हे फीचरही त्यात दिलं गेलं आहे. फोटोग्राफीसाठी १२ मेगापिक्सेल आयसाईट कॅमेराही दिला गेला आहे.
सध्या आयफोन ५ एस २५,००० रुपयांना मिळतो आहे तर आयफोन ६ हा ३२,००० रुपयांना उपलब्ध आहे. देशातील साडे तीन हजार विक्रेत्यांकडे आयफोन ६ई शुक्रवारी ८ एप्रिलपासून उपलब्ध होणार आहे. करड्या, सिल्वर आणि रोझ गोल्ड या तीन रंगात हा फोन मिळणार आहे. १६ जीबी आणि ३२ जीबी अशी दोन मॉडेल्स त्यात उपलब्ध असतील.