मुंबई: मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे, कारण आता त्यांच्या मोबाईलमध्ये असलेलं M-indicator अॅप अपडेट होणार आहे. आता या अॅपमध्ये मोनो, मेट्रो आणि फेरी बोटीची माहितीही असणार आहे.
मुंबईची लाइफलाइन लोकल आणि बेस्ट बसचं वेळापत्रक मुंबईकरांसाठी किती गरजेचं आहे हे लक्षात घेऊन सचिन टेके या मुंबईकर तरुणानं 'एम इंडिकेटर' हे अॅप बाजारात आणलं. या अॅपमध्ये कालांतरानं सचिननं अनेक बदल केले. एक्स्प्रेस गाड्यांची माहिती, टॅक्सी-ऑटोचे दरपत्रक, नोकरीच्या जाहिराती, सिनेमा आणि नाटकांची माहिती सर्व काही या एकाच अॅपमध्ये त्यानं उपलब्ध करून दिले.
मुंबईत आता लोकल सोबत मोनो आणि मेट्रोही दाखल झालीय. त्यामुळं आता सचिननं ही नवीन माहिती आणि त्यांचे टाइमटेबल, तिकीट दर अॅपमध्ये उपलब्ध करून देणार आहे. शिवाय या सेवांचा वापर करण्यासाठी बंधनकारक असलेले नियमही या अॅपवर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसंच मेट्रोसंदर्भात काही तक्रार करायची असल्यास तशी सोयही या अॅपमध्ये उपलब्ध असेल.
इतकंच नव्हे तर रेल्वे आणि रस्ते वाहतुकीसह मुंबईत प्रवासासाठी फेरी बोटींचाही वापर करण्यात येतो. त्यामुळं अर्नाळा ते अर्नाळा किल्ला, नायगाव जेट्टी ते पाणजू बेट, मढ-मार्वे-गोराई ते एस्सेल वर्ल्ड, गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा केव्ज, भाऊचा धक्का ते मांडवा-रेवस-उरण या फेरीबोट सेवांचं टाइम टेबल आणि तिकीटाचे दर देण्यात येणार आहे. सोबत पावसाचे अपडेट्सही यात पाहायला मिळणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.