नवी दिल्ली : आपल्या मोबाईलवर हवी तेव्हा इंटरनेट सेवा सुरु करता येणार आहे तसेच बंदही. दरम्यान, मोबाइल डेटाची संपूर्ण माहिती ग्राहकाला देणे दूरसंचार कंपन्यांना बंधनकारक करण्यात येणार आहे. ग्राहकांना १९२५ या क्रमांकावर इंटरनेट सेवा सुरु तसेच बंद करता येणार आहे.
दूरसंचार कंपन्यांना ग्राहकांच्या पूर्वपरवानगीशिवाय मोबाइल डेटा 'अॅक्टिव्ह' अथवा 'डिअॅक्टिव्ह' करता येणार नाही. या विषयीचा 'डेटा यूज इन्फर्मेशन रेग्युलेशन' १ नोव्हेंबरपासून देशभर लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे मोबाईल कंपन्याच्या मनमानीला चाप बसणार आहे.
दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात 'ट्राय'ने टेलिकॉम कंझ्युमर प्रोटेक्शन रेग्युलेशनमध्ये बदल केले असून, ते लागू करण्यासाठी कंपन्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार कंपन्यांना माहितीच्या वापरासंबंधी ग्राहकांना एसएमएस अथवा यूएसएसडीच्या माध्यमातून ही माहिती द्यावी लागणार आहे.
या शिवाय ५०० एमबी, १०० एमबी आणि १० एमबी डाटा शिल्लक राहिला असतानाही त्या विषयीची माहिती ग्राहकांना द्यावी लागणार आहे. या व्यतिरिक्त डाटाची मर्यादा ९० टक्के झाल्यानंतर योजनेची विस्तृत स्वरुपात माहिती कंपनीला द्यावी लागेल.
कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या विशेष डेटा ऑफरव्यतिरिक्त अन्य योजनांमध्ये प्रत्येकी १० एमबी डेटाचा वापर झाल्यानंतर माहिती द्यावी लागणार आहे. या शिवाय कोणत्याही प्रकारची माहिती मागविण्याचे अधिकार ग्राहकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. विविध विशेष डेटा पॅक अंतर्गत ५० टक्के किंवा १०० टक्के डाटा वापरल्यानंतर त्या विषयीची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
डेटा अॅक्टिव्हेशनसाठी
मोबाइल डेटा वापरणाऱ्याअॅक्टिव्हेट करण्यासाठी अथवा डिअॅक्टिव्हेट करण्यासाठी ग्राहकाला १९२५ या टोल फ्री क्रमांकावर एसएमएस करावा लागणार आहे. 'START' असा एसएमएस करावा लागेल, तर सेवा खंडित करण्यासाठी 'STOP' असा एसएमएस या क्रमांकावर करावा लागेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.