आता, फेसबुकद्वारे करा निशुल्क 'मनी ट्रान्सफर'

होय, तुम्ही आता सोशल वेबसाईट ‘फेसबूक’द्वारे तुमच्या मित्रांना पैसे ट्रान्सफर करू शकता. खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या ‘कोटक महिंद्रा बँके’नं फेसबुकद्वारे पैसे पाठविण्याची नवी सेवा सुरू केलीय. या सेवेद्वारे कुणीही आपल्या मित्रांना लगेचच निशुल्क पैसे पाठवू शकता. 

Updated: Oct 14, 2014, 08:12 AM IST
आता, फेसबुकद्वारे करा निशुल्क 'मनी ट्रान्सफर' title=

मुंबई : होय, तुम्ही आता सोशल वेबसाईट ‘फेसबूक’द्वारे तुमच्या मित्रांना पैसे ट्रान्सफर करू शकता. खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या ‘कोटक महिंद्रा बँके’नं फेसबुकद्वारे पैसे पाठविण्याची नवी सेवा सुरू केलीय. या सेवेद्वारे कुणीही आपल्या मित्रांना लगेचच निशुल्क पैसे पाठवू शकता. 

कोटक महिंद्रा बँकेचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि डिजिटल भागाचे प्रमुख दीपक शर्मा यांनी याबद्दल माहिती दिली. यामध्ये पैसे पाठवण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी व्यक्ती बँकेचा खातेधारक असणं आवश्यक नाही. या सेवेसाठी बँकेनं नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)च्या आयएमपीएस प्लॅटफॉर्मचा वापर केलाय. सध्या, कोणत्याही व्यक्ती मोबाईल फोनद्वारे पैशांची देवाण-घेवाण करणं शक्य झालंय. हे कामंही आयएमपीएसच्या पायागत सुविधांद्वारे केलं जातं. आयएमपीएस प्लॅटफॉर्ममध्ये सध्या २८ बँकांचा समावेश आहे. यातील कोणत्याही बँकेचे खातेधारक फेसबुकद्वारे या नवीन सेवेचा वापर करू शकतील, अशी माहिती शर्मा यांनी दिलीय. 

पैसे मिळवण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही. कोटक महिंद्रा बँकेनं यासाठी रिझर्व्ह बँक आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी हात मिळवणी केलीय. 

ही सुविधा वापरण्यासाठी पैसे पाठविणाऱ्याला आणि पैसे मिळविणाऱ्याला खास या कामासाठी बनविलेली वेबसाईट ‘केपे’वर रजिस्टर करावं लागेल. यामध्ये पैसे पाठविणाऱ्याला व्यक्तिगत माहितीशिवाय बँकेचा एमएमआयडी आणि बँक खात्याची माहिती द्यावी लागेल. एकदा रजिस्ट्रेशन यशस्वी झाल्यानंतर तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता. पैसे मिळवणारा अगोदरपासूनच ‘केपे’वर रजिस्टर असेल तर ही देवाण-घेवाण लगेचच पूर्ण होऊ शकेल. 

ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा शर्मा यांनी केलाय. संपूर्ण प्रक्रियेत दोन वेळा वैधतेची चौकशी होते तसंच ही संपूर्ण देवाण-घेवाण एका ठराविक वेळेत पूर्ण होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.