मंदार मुकुंद पुरकर
अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा हे वाक्य आपल्या खास स्टाईल मध्ये पॉज घेत अटलबिहारी वाजपेयींनी मुंबईत १९८४ सालच्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात म्हटलं होतं. या एका वाक्याने अधिवेशनाला देशभरातून हजर राहिलेल्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचे मोठं काम साध्य केलं होतं.
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचा अक्षरश: पानीपत झालं होतं. लोकसभेच्या अवघ्या दोन जागांवर पक्षाला विजय मिळाला होता. वाजपेयींसह पक्षाचे दिग्गज नेत्यांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. काँग्रेसने तब्बल ४१५ जागांवर विजय मिळवला होता आणि राजीव गांधींच्या रुपाने पहिल्यांदाच युवा पंतप्रधान देशाला लाभला होता. देशभरात राजीव गांधींचा करिष्म्याचा प्रभाव होता. अशा प्रतिकूल परिस्थिती पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी असाधारण सामर्थ्य लागतं ते वाजपेयींच्या ठायी नक्कीच होतं. आणि त्यामुळेच १९९६ साली पहिल्यांदाच बिगर काँग्रेस सरकार दिल्लीत सत्तारुढ झालं आणि पंतप्रधानपदी अटलबिहारी वाजपेयी विराजमान झाले. अर्थात बोफोर्स, राम जन्मभूमी आणि लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा, प्रमोद महाजनांचे नेटवर्कींग याचाही त्यात सिंहाचा वाटा होता हे नाकारता येणार नाही. पण अटलबिहारी वाजपेयींचे नेतृत्व समाजातील सर्व घटकांना आश्वस्त करणारं होतं.
बाबरी मशीदीच्या पतनानंतरही अल्पसंख्यांक समाजात वाजपेयींबद्दल एक प्रकारचे आदराची भावना कायम होती. अटल बिहारी वाजपेयींचे नेतृत्व सर्वसमावेशक होतं. मनाचा साधेपणा, स्वभावातील ऋजूता, व्यक्तीमत्वातली शालीनता, काहीशी नाट्यमय पण मनाचा ठाव घेणारी भाषणाची शैली, हिंदी भाषेवर असलेलं असाधारण प्रभुत्व आणि लोकसभेतल्या कामकाजात व्यासंग, अभ्यास याच्या ताकदीवर सत्ताधारी पक्षाला चितपट करण्याची ताकद ही वाजपेयींची बलस्थानं. कार्यकर्तांना प्रचंड उर्जा देण्याची ताकद वाजपेयींमध्ये होती त्यामुळेच देशभरातल्या कार्यकर्त्यांचे मोहोळ त्यांच्या भोवती जमा होत असे. लोकसभेत बोफोर्सच्या प्रकरणात त्यांनी काँग्रेसला गारद केलं. लोकसभेतली त्यांची भाषणं हा पुढच्या संसदपटूंसाठीच नाही तर सर्वच युवकांसाठी एक अभ्यासाचा विषय आहे.
अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा १९५७ साली लोकसभेवर निवडून गेले आणि त्यांचे अमोघ वक्तृत्व पं. जवाहरलाल नेहरूंनी ऐकलं आणि त्यांनी भाकित केलं होतं की एक दिवस हा युवक देशाचं नेतृत्व करेल. नेहरुंचे भाकित खरं ठरलं.
अटल बिहारी वाजपेयींचा परराष्ट्र धोरणावरचा व्यासंग असाच वादातीत आहे. त्यामुळे काश्मीर समस्येच्या संदर्भात युनोमध्ये जेव्हा हा विषय चर्चेला आला तेंव्हा पंतप्रधान नरसिंहरावांनी विरोधी पक्षात असलेल्या वाजपेयींनाच पाठवलं होतं, यात सारं काही आलं.
आज वयाची ८८ वर्षे पूर्ण करणारे वाजपेयी शरीराने थकले असले तरी त्यांनी देशाला खूप काही दिलं... भरभरून दिलं. वाजपेयींच्या पिढीचा ध्येयवाद, विचारांशी अखेर पर्यंत एकनिष्ठ राहण्याचं व्रत हे गुण आजच्या पिढीने अंगीकारण्यासारखे आहेत एवढचं सांगावसं वाटतं.