अमोल जोशी, वृत्तनिवेदक
स्वतःचे विचार स्वतःलाच न पटणं आणि आपणांस पटणाऱ्या विचारांच्या विरुद्ध स्वतःच कृती करत राहणं या दोन्ही गोष्टी त्रासदायक. ‘जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नही’ हे वाक्य शाळेत असताना पहिल्यांदा कानावर पडलं. त्यावेळी ते वाक्य जितकं छान वाटलं तितकंच ते आजही आवडतं. जिंदगी बडी होनी चाहिए, हे पटतं. पण साधारण पस्तीशी ते चाळीशीत मरणाला हसत हसत स्विकारणाऱ्या आनंदसारखी परिस्थिती आपल्यावर आली, तर आपणदेखील हसत मरू का? याचं उत्तर ‘नाही’ असंच येतं. याचं कारण कदाचित जिंदगी ‘बडी’ असणं म्हणजे काय हे माहित नसणं असावं. तीस-एकतीस वर्षं गेली. कळत्या वयाचे झाल्यापासून जरी पकडलं तरी वीस-बावीस नक्कीच गेली. जिंदगी ‘बडी’ असण्याचे नेमके निकष ठाऊक नसले, तरी आपल्या परिनं आपण ती ‘बडी’ जगण्याचाच प्रयत्न केला. अर्थात, मुद्दाम कुणी कशाला जिंदगी ‘छोटी’ जगेल? पण तरीही ‘लंबी’ जिंदगीचं आकर्षण कमी व्हायला तयार नाही.
दुसरा मुद्दा. ‘लंबी’ जिंदगी जगण्याची इच्छा तर आहे. मात्र जिंदगीची लंबाई कमी करणा-या गोष्टींचं आकर्षणही सुटत नाही. जिंदगी लंबी होण्यासाठी आवश्यक आणि पोषक ठरणारे प्रयत्नही हातून होत नाहीत. ‘बडी’ आणि ‘लंबी’मधला संघर्ष रात्रंदिवस सुरू आहे. मोहाच्या क्षणी ‘बडी’ जिंदगी वश करते. मोहाचे क्षण नाकारणं म्हणजे बड्या जिंदगीला अव्हेरणं, असं वाटतं. मोहाचे क्षण सरुन भानावर यायला झालं की लंब्या जिंदगीचा भरवसा वाटेनासा होतो. जिंदगीची ‘लंबाई’ आपणच आपल्या हातांनी कमी करत असल्याच्या जाणीवेनं काळजात धस्स होतं. बेधुंद क्षणी जिंदगीच्या ‘लंबाईचं’ आकर्षण का राहत नाही? धुंदी उतरल्यावर जिंदगीच्या ‘बड्या’ असण्याचं आकर्षण का उरत नाही?
‘आयुष्य आत्ता नाही जगायचं, तर कधी जगायचं?’ हा काय प्रश्न आहे? काय याचा अर्थ? आजचा दिवस जगून आयुष्य संपवून टाकायचं असेल, तर या प्रश्नातील बेफिकिरी समजण्यासारखी आहे. मात्र या प्रश्नाला जोडूनच पुढचं वाक्य येत, ‘उद्या काय होईल, कुणास ठाऊक?’ आजच्या जगण्याचं कारण हे जगण्याची ऊर्मी नाहीच. उद्याची अनिश्चितता आहे. त्यामुळं ‘उद्या’ची जबाबदारी न घेता ‘आज’ निघून जात असेलही, मात्र त्यामुळं ‘काल’नं करून ठेवलेली कर्जें फेडूनच ‘आज’ची बेगमी करावी लागते. कर्जफेड आणि उधळपट्टी या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी सुरू राहिल्यामुळं हाती काहीच लागत नाही. कालचे कर्ज फेडून पुन्हा उद्याचे कर्ज तयार करणाऱ्या जगण्याला ‘बडी जिंदगी’ तरी कसं म्हणावं? आणि अशी कर्जें फेडत १०० वर्षं जरी जगलो, तरी अशा ‘लंबी जिंदगी’चं कौतुक काय म्हणून करावं?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.