राज्य सांस्कृतिक संचालनालय आणि विशेष समाज कल्याण अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित राज्य नाट्य स्पर्धेत सध्याच्या राजकारणावर भाष्य करणारे सामाजिक आशयप्रधान ‘वार- करी’ हे नाटक बॉश फाईन आर्ट्सने सादर केले.
महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित स्पर्धेत आदित्य निमकर लिखित आणि प्रशांत हिरे दिग्दर्शित ‘वार-करी’ नाटक सादर करण्यात आले. मंदिरातून तुकोबाच्या मुखवट्याची चोरी होते आणि सार्या दिंड्या देहूकडे प्रस्थान ठोकतात. जोपर्यंत तुकोबाचा चोरीला गेलेला मुखवटा सापडत नाही आणि चोराला अटक होत नाही तोपर्यंत आध्यात्मिक सत्याग्रह पुकारला जातो. पोलिसांवर तातडीने तपास लावण्यासंदर्भात राजकीय पातळीवरून दबाव आणला जातो. तपास सुरू असतानाच स्वत: तुकोबाही अवतरतात. राजकीय पातळीवर या घटनेचे जे काही पडसाद उठतात, त्याचं अत्यंत परिणामकारक दर्शन या नाटकातून घडलं. वार-करी नाटकाला यापूर्वीही राज्यस्तऱीय उत्कृष्ट लिखाणाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.