बॉलिवूडच्या सिंघमचे ४३ व्या वर्षात पदार्पण

अजय देवगण आज वयाच्या ४३ व्या वर्षात पदार्पण करत आहे, त्याला झी २४ तासकडून वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

Updated: Apr 2, 2012, 03:40 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

फूल और काँटे आठवतोय तुम्हाला..... मैने प्यार तुम्ही से किया है….हे गाणं नक्कीच लक्षात राहिलं असेल. बॉलिवूडमधले स्टंट गुरु वीरु देवगण यांचे सूपूत्र अशी ओळख असलेल्या अजय देवगणचा हा पदार्पणातला सिनेमा. फूल और काँटे १९९१ साली प्रदर्शित झाला होता. सुरुवातीच्या काळात रुप आणि अभिनय दोन्ही सामान्य (अती) असलेल्या अजय देवगणने आपल्या भन्नाट स्टंटसच्या जोरावर आपलं स्थान निर्माण केलं. सुरुवातीच्या काळातले अनेक सिनेमे आता लक्षातही ठेवण्याजोगे नाहीत. पण नंतरच्या काळात अजयने अभिनयात उत्तरोत्तर सुधारणा केली.

 

महेश भटच्या १९९९ सालच्या जखममध्ये अजयने आपल्या अभिनय सामर्थ्याच्या जोरावर राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. त्यानंतरच्या दशकात मात्र त्याने खरचं मेहनतीने अनेक सिनेमांमध्ये आपला ठसा उमटवला. प्यार तो होना ही था,  हम दिल दे चुके सनम आणि कच्चे धागे या सिनेमात त्याने संवेदनशील अभिनय केला. राजकुमार संतोषीच्या द लेजंड ऑफ भगतसिंग या सिनेमासाठी त्याला दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. रेनकोट आणि युवा हेही त्याच्य कारकिर्दीतले महत्वाचे टप्पे आहेत.

 

गेल्या दोन वर्षात त्याने वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, राजनिती आणि सिंघम यासारखे मेगाहिट सिनेमे दिले. सिंघमने तर बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपये उत्पन्नाचा विक्रम नोंदवत पैशाच्या पाऊस फक्त खान मंडळीच पाडू शकतात हा समज चुकीचा ठरवला. अजय देवगण आज वयाच्या ४३ व्या वर्षात पदार्पण करत आहे, त्याला झी २४ तासकडून वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.