www.24taas.com, मुंबई
थ्री इडियट या चित्रपटाने यशाची शिखरं गाठली होती. मात्र, फेरारी की सवारी या चित्रपटात असे काहीच दिसले नाही. चित्रपट आपल्या थीमपासून काही प्रमाणात भटकल्यासारखी वाटते. सचिन तेंडुलकर आणि त्याची फेरारी कारवर राजकुमार हिरानी यांनी फेरारी की सवारी या चित्रपटाची कहाणी लिहिली आहे.
फेरारी की सवारी हा चित्रपट एका बाप-बेट्याच्या संबंधांवर प्रकाश टाकतो. रूसीचा (शरमन जोशी) मुलगा कायो (ऋत्विक साहोरे) याचे स्वप्न एक मोठा क्रिकेटर होण्याचे असते. आरटीओमध्ये क्लार्क असूनही प्रामाणिक असल्याने त्याची परिस्थिती हालाखीची असते. प्रामाणिक इतका की रेड सिग्नलमध्ये त्याची गाडी चुकून पुढे गेली तर स्वतः पोलिसांकडे जाऊन तो फाइन भरतो.
रूसीसारखे कॅरेक्टर सध्या चित्रपटातून गायब आहे, कारण ते रिअलिस्टिक वाटत नाहीत. तसेच या जगात फारच कमी लोक असे शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे असे कॅरेक्टर चित्रपटातच शोभतात. त्याचा भोळसटपणा, इमानदारी आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन यामुळे चित्रपट पाहताना एक आल्हाददायक वातावरण तयार होते.
चित्रपटात परेश रावल, बोमन इरानी आणि शरमन जोशी यांची जबरदस्त अभिनय आपल्याला पाहायला मिळतो. परंतु, चित्रपट पटकथेमुळे फारच कमजोर जाणवतो. चित्रपटाची भट्टी जशी बनायला पाहिजे होती तशी तयार झाली नाही. चित्रपट दुसऱ्या टप्प्यात ढिल्ला पडला. सचिनच्या घरासमोर त्याची फेरारी गायब करण्याचा प्रसंग गळ्याच्या खाली उतरत नाही. परंतु, दमदार अभिनय यामुळे चित्रपट पाहावासा वाटतो.
दिग्दर्शक म्हणून राजेश मापुस्कर यांचा हा पहिला चित्रपट आहे. त्यांनी सर्व कलाकारांकडून कसून अभिनय करून घेतला आहे, तसेच तीन पिढ्यांमधील नात्यांची गुंफण फारच सुंदर केली आहे. अभिनयाच्या दृष्टीकोनातून पाहिले तर शरमन जोशीच्या सर्वात चांगल्या चित्रपटांपैकी एक असे या चित्रपटाचे वर्णन करता येईल.
चित्रपटाचे संगीत सामान्य आहे. विद्या बालन हिचे आयटम साँग ठिक-ठाक आहे. ते कुठेतरी ऑड वाटते. एकूणच चित्रपटाचा विचार करता निखळ मनोरंजनासाठी एकदा पाहण्यासारखा हा चित्रपट आहे.