www.24taas.com, मुंबई
सत्यमेव जयते या कार्यक्रमाच्या टीआरपीबाबत मला अजिबात काळजी नाही, असं म्हणणाऱ्या आमीर खानला मात्र आत टीआरपीची काळजी करावी लागणार आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमीर खान याच्या ‘सत्यमेव जयते’ या शोसाठी ‘ऑल इज नॉट वेल’ अशीच स्थिती आहे. सुरुवातीला ‘रिऍल्टी शो’च्या गर्दीत धमाका करणार्या या ‘शो’चा टीआरपी दर आठवड्याला घसरत चालला आहे.
‘सत्यमेव जयते’ला अवघ्या अडीच महिन्यांतच उतरती कळा लागली आहे. आमीर छोट्या पडद्यावर या ‘शो’द्वारे एण्ट्री करीत असल्याने सुरुवातीला या ‘शो’बद्दल प्रचंड उत्सुकता होती. पहिल्याच ‘शो’ला ३.८ टीआरपी मिळाल्याने थेट ‘रामायण’, ‘महाभारत’ तसेच महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ यांच्याशी ‘सत्यमेव जयते’ची तुलना केली गेली. पण आमीरला मोठा धक्का बसला आहे. सुरुवातीला ‘आमीर खान रॉक्स...’ असे कौतुक करणारे प्रेक्षक ‘समस्यांवर नुसती चर्चा काय कामाची, समस्या सुटणार कशा’ असा प्रश्न विचारत या ‘शो’कडे पाठ करू लागले आहेत.
‘शो’चा टीआरपी घसरून ३.८ वरून २.२४ वर आला आहे. ‘टॅम’ ही एजन्सी टीआरपी मोजते. टॅमने वेगवेगळ्या स्तरातील जवळपास ८५०० लोकांच्या घरी मीटर लावले आहेत. टीव्ही किती वेळ पाहिला जातो, कोणता कार्यक्रम अधिक पाहिला जातो याची नोंद हा मीटर करतो. आयपीएलच्या फायनलला ९.८ एवढा टीआरपी नोंदला गेला होता.